गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाकडून माध्यान्ह आहार पुरवठादाराची अनुज्ञप्ती रहित

सावईवेरे आणि केरी येथील शाळांतील माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्याचे प्रकरण

पणजी, २८ सप्टेंबर (वार्ता.) : सावईवेरे आणि केरी येथील शाळांतील मुलांना देण्यात आलेल्या माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्याच्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) माध्यान्ह आहाराचा पुरवठा करणार्‍या मंगेशी येथील ‘उत्कर्ष महिला स्वयंसहाय्य गटा’ची अनुज्ञप्ती रहित केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

 (सौजन्य : Dainik Gomantak TV)

ते पुढे म्हणाले,

‘‘सरकार असे प्रकार खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळाला पाहिजे आणि यासाठीच ‘अक्षय्यपात्र’ सारख्या संस्थांना या क्षेत्रात स्थान देण्यात आले आहे. चांगल्या दर्जाचा माध्यान्ह आहार पुरवणार्‍या स्वयंसाहाय्य गटाच्या कामात सरकार हस्तक्षेप करणार नाही; मात्र निष्काळजीपणा करणार्‍या गटांवर कारवाई करण्यात येईल.’’

 (सौजन्य : Dainik Gomantak TV)

बाल हक्क आयोगाची शिक्षण खात्याला नोटीस

सावईवेरे आणि केरी येथील शाळांतील माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्याच्या प्रकरणी बाल हक्क आयोगाने शिक्षण खात्याला नोटीस पाठवली आहे. आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस म्हणाले, ‘‘हा केवळ दुर्लक्षपणा आहे. आहाराच्या गुणवत्तेची निश्‍चिती करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळ्यांवर विस्तृत निरीक्षण यंत्रणा उपलब्ध असूनही हा प्रकार घडणे हे धक्कादायक आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निरीक्षण यंत्रणा सक्षम करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.’’

अन्न आणि औषध प्रशासनाने आहाराचे नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी या घटनेसंबंधीचा संपूर्ण अहवाल मागितला आहे.