सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांचे स्थानांतर !

सातारा, २८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांनी याच वर्षी जानेवारी मासात पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लाच मागणार्‍यांवर कडक कारवाईचा धडाका लावला होता. ९ मास पूर्ण होत असतांनाच त्यांचे मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागात साहाय्यक आयुक्त पदावर स्थानांतर करण्यात आले आहे.

सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पहिला महिला अधिकारी होण्याचा मान उज्ज्वल वैद्य यांना मिळाला. १२ जानेवारी २०२३ या दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लाच घेणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. कार्यालयात येणार्‍या प्रत्येक तक्रारीची नोंद घेत त्यांनी ६ मासांत ७ मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वाधिक कारवाई महसूल विभागात झाली असून ‘वर्ग ३’चे ४ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकले आहेत. तसेच शिक्षण विभाग, पोलीस दल, न्याय आणि विधी विभाग या ठिकाणीही त्यांनी कामाचा ठसा उमठवला. कार्यालयात येणार्‍या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारीची त्या वैयक्तिक नोंद घेत. त्यामुळे त्यांच्याप्रती नागरिकांच्या मनात दृढ विश्वास निर्माण झाला होता.