(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
१. श्री गणेशाची १२ नावे
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकदशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥
अर्थ : पहिले वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्त्र, पाचवे लंबोदर, सहावे विकट, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्ण, नववे भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपति आणि बारावे गजानन, अशी श्री गणेशाची बारा नावे आहेत.
२. समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेल्या श्री गणेशाच्या १२ नावांच्या स्थानांची माहिती
वरील १२ नावांची गणपतीची स्थाने देशाच्या निरनिराळ्या भागात असून समर्थ रामदासस्वामींनी या स्थानांचा शोध लावला आहे.
अ. वक्रतुण्ड : कन्नानूर, मद्रास
आ. एकदन्त : कोलकाता, बंगाल
इ. कृष्णपिंगाक्ष : कन्याकुमारी
ई. गजवक्त्र : भुवनेश्वरजवळ, ओडिशा
उ. लंबोदर : गणपती पुळे, जिल्हा रत्नागिरी
ऊ. विकट : हृषिकेश, हिमालयाच्या पायथ्याशी, उत्तराखंड
ए. विघ्नराजेंद्र : कुरुक्षेत्र, हरियाणा
ऐ. धूम्रवर्ण : केरळ आणि तिबेट या दोन्ही ठिकाणी
ओ. भालचंद्र : रामेश्वर, तमिळनाडू
औ. विनायक : काशीक्षेत्र, उत्तरप्रदेश
क. महागणपति : गोकर्ण महाबळेश्वर, कर्नाटक
ख. गजानन : पांडूकेश्वर तीर्थक्षेत्री, उत्तराखंड
३. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाला तुळस का वहातात ?
गणेश म्हणजे सत्त्व, रज आणि तम या गुणांचा प्रतिनिधी. गणेशाच्या उपासनेला चतुर्थीला महत्त्व आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती पूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे आहे; कारण ‘गणपतीच्या तपश्चर्येचा भंग केल्याविषयी वृंदा नामक राजकन्येला तुळस वृक्षाचे रूप येईल’, असा गणपतीने शाप दिला. तिने गणपतीची पुष्कळ तपश्चर्या केली आणि गणपतीने प्रसन्न होऊन सांगितले, ‘माझ्या पूजेत तुला एक दिवसाचे स्थान राहील.’
४. मांदार आणि शमी यांच्याविषयीची कथा
दूर्वांप्रमाणेच गणपतीला शमी पाने आवडतात. मांदाराचे झाड गणपतीच्या आवडीचे आहे. मांदाराच्या नुसत्या मुळीचे पूजन केले, तरी मांदार गणेशाचे पूजन फलदायी होते. और्य ऋषींची कन्या शमी आणि धौम्यऋषींचा मुलगा मांदार यांचे लग्न झाले. एकदा भृशुंडीऋषि त्यांच्या आश्रमात आले असता त्यांची हत्तीसारखी सोंड पाहून शमी आणि मांदार हसू लागले, तेव्हा ‘तुम्ही दोघे वृक्ष योनीत जन्म घ्याल’, असा भृशुंडीऋषींनी शाप दिला अन् दोघांचे झाडात रूपांतर झाले. मांदारचे गुरु शैनक यांनी त्या दोघांच्या सुटकेसाठी गणपतीची घोर तपश्चर्या केली. प्रसन्न झाल्यावर गणपति म्हणाला, ‘‘भृशुंडी गणेश भक्त असल्यामुळे त्याचा शाप खोटा ठरणार नाही. हवे, तर मी मांदार वृक्षाच्या मुळाशी रहातो आणि शमीला माझ्या पूजेत स्थान देतो.’’
५. गणपतीला दूर्वा का वाहिल्या गेल्या ?
अनलासूर नावाच्या दैत्याने तपश्चर्या करून भगवान शंकराकडून अजिंक्य असा वर मागून घेतला आणि त्याने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. या वेळी सर्वांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी गणपतीचे स्तवन केले. त्या वेळी गणपतीने प्रकट होऊन प्रचंड स्वरूप धारण करून त्या दैत्याला गिळले. दैत्याचे तेजस्वी अग्नीसारखे प्रचंड शरीर गणपतीच्या पोटात गेल्याने गणपतीच्या शरिराचा दाह होऊ लागला आणि तो दाह काही केल्या शांत होईना. चंद्राने आपले शीतलत्त्व दिले, तरीही दाह शांत होईना. इतक्यात तेथे काही ऋषी दूर्वा घेऊन आले. त्यांनी गणपतीची स्तुती केली आणि भावपूर्ण अंतःकरणाने त्या दूर्वा गणपतीच्या मस्तकावर अर्पण केल्या अन् दाह शांत झाला. तेव्हा गणपति सर्व देवांना म्हणाला, ‘‘मला दूर्वा पुष्कळ प्रिय आहेत.’’ त्या वेळेपासून सर्व देवांनी दूर्वा वाहून गणपतीचे पूजन चालू केले.
६. गणपतीला शेंदूर लावण्याच्या प्रथेचा आरंभ कधी झाला ?
‘सिंदुराला ठार केल्यावर घृष्णेश्वर जवळील सिंदूरवाडा येथे गणपतीने सिंदुरासुराचे रक्त स्वतःच्या अंगास माखून घेतले आणि अवतार कार्य संपवले’, अशी कथा आहे. तेव्हापासून गणपतीला शेंदूर फासण्याच्या प्रथेचा आरंभ झाला आहे.
७. गणेशाचे वाहन उंदीर का ?
क्रौंच नावाच्या गंधर्वाने दरबारात वामदेव नामक ऋषींना रागाने लाथ मारली. त्यामुळे वामदेवांनी शाप दिल्यामुळे तो गंधर्व उंदीर झाला. त्याने पाराशरऋषींच्या आश्रमात जाऊन धान्याचा फडशा पाडणे चालू केले. त्याला कंटाळून पाराशरऋषींनी गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा गणपतीने त्याला कायमचे अंकित ठेवण्यासाठी स्वतःचे वाहन बनवले. तेव्हापासून गणेशाचे वाहन उंदीर आहे.
८. गणपतीची अन्य नावे
गणपतीला तमिळ भाषेत विल्लायार, द्राविडीत मकन, दक्षिणेत अन्यत्र इदंबुरी विनायक, सिंधु खोरे आणि नेपाळ येथे सूर्य गणपति, ब्रह्मदेशात महाबिनी, मंगोलियात धोतकार, तिबेटमध्ये लोकप्राक, कंबोडियात प्रह गणेश आणि जपानमध्ये विनायकशा, अशा नावांनी ओळखले जाते.
गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !
लेखक : रमाकांत पंडित साईदासानंद, माटुंगा, मुंबई.