परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

(Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati) 

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, २३ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आणून आणि स्थानिक मूर्तीकारांना विशेष अनुदान देऊन चांगला पायंडा घातला आहे. सरकारच्या या योजनेमुळे खरेतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री थांबणे कायद्याने बंधनकारक होते; परंतु असे न होता गोव्याबाहेरून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती मातीच्या असल्याचे खोटे सांगून त्यांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे. गेल्या ३ – ४ वर्षांत श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर गोव्यातील नद्या, तळी, विहिरी यांच्या पात्रांचे निरीक्षण केले असता कित्येक मास पाण्यात तरंगत असलेल्या आणि अवयव तुटलेल्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आणि त्यांना रंगवण्यासाठी वापरलेले रासायनिक रंग यांविषयीच्या दुष्परिणामांची समाजात विशेष माहिती नाही. त्यामुळे अशा मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असा गैरसमज समाजात निर्माण झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ अन् राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ. तसेच पर्यावरण खात्याने या संदर्भात जागृती मोहीम तीव्र करण्याबरोबर ‘मातीच्या मूर्तींचा वापर करण्याकडे भाविकांचा कल वाढेल’, यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. गोव्यात जुन्या काळापासून शाडूच्या मूर्ती करण्याची परंपरा होती. त्याला नैसर्गिक रंग वापरण्यास प्राधान्य देऊन ही चळवळ लोकमान्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.

श्री. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

काही मूर्तीकार खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडून अनुदान मिळवण्यासाठी बाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणतात आणि त्याला मातीचा गिलावा देऊन ‘मूर्ती मातीच्या आहेत’, असा आभास निर्माण करतात. याची कल्पना प्रशासनाला असली पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये ‘जिप्सम’ नावाचा घटक असतो, तो सहजासहजी पाण्याशी एकरूप होत नाही.’’ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना निसर्गाचेही रक्षण होईल, याची दक्षता घ्या, असे आवाहनही श्री. राजेंद्र केरकर यांनी केले आहे.

कासारवर्णे येथे विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यावर तरंगल्या

(प्रतिकात्मक चित्र)

पेडणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – कासारवर्णे येथील एका तळ्यात विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यावर तरंगतांना आढळून आल्या आहेत. म्हणजे सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातलेली असतांना हा प्रकार घडला आहे. मिरामार समुद्रकिनारीही अशाच प्रकारे २ श्री गणेशमूर्ती वाहून आल्याची बातमी छायाचित्रासह टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली आहे.

गोव्यात अनेक ठिकाणी पर्यावरणप्रेमी नागरिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेऊ नयेत, यासाठी आग्रह धरत आहेत आणि लोकांना आवाहन करत आहेत. या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही, तसेच आपले श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची विटंबना होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून झालेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक) 

संपादकीय भूमिका

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !