पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया येथील ‘आसियान-इंडिया परिषदे’च्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘भारताचे पंतप्रधान’ असा उल्लेख !

काँग्रेसची टीका

(‘आसियान’ म्हणजे दक्षिण-पूर्व आशिया देशांची संघटना)

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया येथे होणार्‍या ‘आसियान-इंडिया परिषदे’ला उपस्थित रहाण्यासाठी ६ सप्टेंबरला मार्गस्थ झाले. त्यांच्या या दौर्‍याच्या संदर्भातील सरकारच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेवर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ लिहिण्यात आले आहे. या आधी जी-२० परिषदेसाठी उपस्थित रहाणार्‍या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भारताच्या राष्ट्रपतींकडून रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्या निमंत्रण पत्रिकेवरही ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे लिहिण्यात आले होते. यानंतर देशात वाद निर्माण झाला असतांना आता पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या संदर्भातही ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

पंतप्रधानांच्या या भेटीशी संबंधित पत्रिका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटरवर) शेअर केली होती. ज्यामध्ये ‘भारताचे पंतप्रधान’ असे लिहिलेले दिसत आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही तिच पत्रिका ‘शेअर’ करत लिहिले, ‘पहा, मोदी सरकार किती गोंधळले आहे ! या कार्यक्रमाचे नाव २० वी ‘आसियान-इंडिया परिषद’ आहे, ज्यामध्ये ‘भारता’चे पंतप्रधान सहभागी होणार आहेत. विरोधकांनी एकजूट दाखवल्यामुळे हे सर्व नाट्य घडत आहे.

आसियान देश

आसियान देशांमध्ये मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई, थायलंड, लाओस आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. भारताला या परिषदेस सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाते.

आसियान परिषदेत भारत काय करणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या इंडोनेशिया दौर्‍यात आसियान सदस्य देशांशी व्यापार आणि सुरक्षा यांवर चर्चा करणार आहेत. तसेच आसियान देशांमध्ये ‘युपीआय’ (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस – ऑनलाईन व्यवहार करणे) सेवा प्रारंभ करण्याची घोषणा परिषदेच्या काळात केली जाऊ शकते. ही परिषद ५ ते ८ सप्टेंबर अशी होत आहे. पंतप्रधान मोदी ६ आणि ७ सप्टेंबर या दोन दिवशी यात सहभागी होणार आहेत. यापूर्वी वर्ष २०१९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी झाले होते. आता अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह हेही परिषदेत सहभागी होणार आहेत.

चीन आणि आसियान देशांचे संबंध तणावपूर्ण !

नुकतेच दक्षिण चीन समुद्रात चिनी सैन्याने फिलिपाईन्सच्या नौकेवर आक्रमण केले होते. यावर अमेरिकेने चीनवर या भागात तणाव निर्माण करण्याचा आणि दुसर्‍याच्या भूभागात घुसखोरी केल्याचा आरोप केला. दक्षिण चीन समुद्राविषयी आसियान देश आणि चीन यांच्यामध्ये वाद आहे. या भागात चीनचा सामना करण्यासाठी आसियान देश अमेरिका आणि भारत यांचे साहाय्य घेतात. वर्ष १९९० च्या दशकात आर्थिक संकटामुळे या देशांचे चीनवरील अवलंबित्व पुष्कळ वाढले होते. त्या काळात चीनची आर्थिक स्थिती खूपच चांगली होती. यामुळे आसियानने चीनसमवतेत मुक्त व्यापार करार केला; मात्र चीनने याचा अपलाभ घेण्यास चालू केल्यावर या देशांनी अमेरिका आणि भारत यांसारख्या देशांशी संबंध दृढ करून त्यांना त्यांचेे संवाद भागीदार बनवले.

संपादकीय भूमिका

सहस्रो वर्षांपासून या देशाचे नाव ‘भारत’ असतांना जर त्याचा उल्लेख पंतप्रधान करत असतील, तर काँग्रेसच्या पोटात का दुखत आहे ? जर सध्याचे सरकार ‘इंडिया’ शब्दाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळत असेल, तर काँग्रेसला काय अडचण आहे ?