जे.जे. रुग्‍णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्‍ध करून देणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई – सर्वसामान्‍य रुग्‍णांना परवडेल, अशा दरात सर जे.जे. रुग्‍णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याविषयी २९ ऑगस्‍ट या दिवशी मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्‍त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्‍णालयाच्‍या अधिष्‍ठात्‍या डॉ. पल्लवी सापळे उपस्‍थित होते.

मंत्री मुश्रीफ म्‍हणाले की, जे.जे. रुग्‍णालयात महाराष्‍ट्रातूनच नव्‍हे, तर देशभरातून येणार्‍या गरीब आणि गरजू रुग्‍णांवर गुणवत्तापूर्ण उपचार केले जातात. जे.जे. रुग्‍णालयात १ सहस्र ३५२ साध्‍या खाटा आणि अतीदक्षता विभागाच्‍या १०० खाटा आहेत. या रुग्‍णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यामुळे मुंबईसह राज्‍यातील सर्वसामान्‍य रुग्‍णांना आधार मिळेल.