मुंबई – तलाठी भरती प्रक्रियेत राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवरील सर्व्हर बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या प्रकरणी ‘सरकारने विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रामध्ये जयंत पाटील यांनी राज्यात काही परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याचाही आरोप केला आहे. नुकतेच म्हाडाच्या भरती प्रक्रियेत अपप्रकार करणार्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वारंवार अशा घडणार्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सरकारने या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागांच्या अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ सहस्र ६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. राज्यातील १० लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली.