पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नेपाळचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा नकार !

नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्याचे केले होते विधान !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या दौर्‍यावर असणारे मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नकार दिल्याचे म्हटले जात आहे. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नेपाळमधील त्यांच्या कथांमध्ये नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्याचे विधान केले होते. त्यावरून राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. नेपाळमध्ये हिंदुद्वेषी कम्युनिस्ट पार्टीचे सरकार आहे.

पंतप्रधान प्रचंड यांचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्याचा कार्यक्रम होता; मात्र नंतर व्यस्ततेचे कारण देत प्रचंड यांनी भेटण्यास नकार दिला. त्यापूर्वी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची भेट घेण्याचेही नियोजित होते; मात्र पौडेल यांनी प्रकृती चांगली नसल्याचे सांगत भेटण्यास नकार दिला.

मी कुणाचा विरोधक नाही, तर सनातन धर्माचा समर्थक आहे ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी शाश्‍वतधाम येथील त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितले की, नेपाळ पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे आणि सनातन धर्माची पताका येथे नेहमीच फडकत राहो. मी कुणाचा विरोधक नाही; मात्र मी सनातन धर्माचा समर्थक आहे. नेपाळ आमचा आत्मा आहे. एक दिवस संपूर्ण जगात नेपाळ त्याचा डंका वाजवेल.

संपादकीय भूमिका

  • नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्याने त्यांना हिंदु आणि हिंदु राष्ट्र यांची अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना भेटण्यास नकार दिल्याने आश्‍चर्य वाटत नाही !
  • नेपाळमधील हिंदु जनतेने जागे होऊन संघटितपणे चीनच्या जोखडातून नेपाळला सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तरच ही स्थिती पालटेल !