ठाणे, १७ ऑगस्ट (वार्ता.) – मुंब्रा येथील सैनिकनगर परिसरात उघड्यावर पडलेल्या विद्युत्वाहिनीच्या झटक्याने रवी चौहान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रवी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दूध आणण्यासाठी जातांना ही दुर्घटना घडली. ‘टोरंट’ आस्थापनाच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा परिसरात विद्युत्पुरवठा केला जातो. आस्थापनाच्या खांबावरील विद्युत्वाहिनी मासातून २ ते ३ वेळा अशाच प्रकारे उघड्यावर पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तरुणाच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या वीज वितरण आस्थापनावर कठोर कारवाई करायला हवी !- संपादक)