कुराण जाळण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी डेन्मार्क आणणार कायदा !

अल्जेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा !

कोपनहेगन (डेन्मार्क) – युरोपीय देश डेन्मार्क येथे मुसलमानांचा धर्मग्रंथ कुराणला जाळण्याच्या अनेक घटना झाल्यामुळे डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री लार्स लॉक्के रास्मुसेन यांनी आमचे परराष्ट्रमंत्री अहमद अत्ताफ यांच्याकडे क्षमा मागितल्याचा दावा अल्जेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. डेन्मार्कमधील विविध इस्लामी देशांच्या दूतावासांच्या बाहेर विविध डॅनिश नागरिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्याच्या घटना गेल्या काही मासांत समोर आल्या आहेत. यांमध्ये अल्जेरियाच्या दूतावासाचा समावेशही होता.

अल्जेरियन परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, रास्मुसेन यांनी या घटनांना असहिष्णु आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. ही कृत्ये डॅनिश समाजात रुजलेल्या आतिथ्य, सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता या अंगीभूत गुणांच्या विरोधी आहेत. आम्ही अशा घटना घडू नयेत, म्हणून एक कायदा आणणार आहोत. पुढील ४ आठवड्यांत यासंदर्भातील विधेयक डेन्मार्कच्या संसदेत मांडण्यात जाईल, असे आश्‍वासन रास्मुसेन यांनी दिल्याचे अल्जेरियन मंत्रालयाचे म्हणणे आहे. जुलै मासाच्या आरंभी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी अशा घटनांवर पुष्कळ चिंतित असल्याचे म्हटले होते.

वर्ष २०२३ मधील कुराण जाळल्याच्या घडलेल्या घटनांचा धावता वेध !

१४ ऑगस्ट : स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथील रॉयल पॅलेसच्या समोरही अशी घटना घडली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याच्या उपस्थितीत संबंधित दोन व्यक्तींनी कुराणला लाथ मारली आणि त्याची काही पृष्ठे जाळली. स्विडनमध्ये ‘व्यक्ती स्वातंत्र्या’च्या कायद्याखाली असे कृत्य करण्याला अनुमती आहे.

१२ ऑगस्ट : ‘डॅन्स्के पेट्रियटर’ या संस्थेच्या सदस्यांनी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथील तुर्कीयेच्या दूतावासाबाहेर कुराण जाळले. ‘अनादोलू अंजान्सी’ या तुर्कीयेच्या प्रसारमाध्यमाने ही घटना घडल्याचा दावा करत म्हटले की, याच गटाने काही अंतरावर असलेल्या इराकी दूतावासासमोर जाऊन तेथेही कुराण जाळले. २१ जुलै या दिवशीही या गटाने असे कृत्य केले होते.

१ आणि ३ ऑगस्ट : कोपनहेगन येथील तुर्कीये, इराण, इराक, इजिप्त आणि सौदी  अरेबिया येथील दूतावासांबाहेर कुराण जाळण्यात आले.

२८ जून : स्विडनच्या स्टॉकहोममधील ‘सेंट्रल मॉस्क’च्या बाहेर एका व्यक्तीने कुराणला फाडून जाळले होते.
एप्रिल २०२३ : एका गटाने डेन्मार्कच्या कोपनहेगन येथील तुर्कीयेच्या दूतावासाबाहेर कुराण जाळले होते.