संपादकीय
पाकिस्तानचा इतिहास पाहिला, तर असे लक्षात येते की, तो लष्करी हस्तक्षेपातून सत्तापालट, हत्या, अस्थिरता आणि पराकोटीचे राजकीय शत्रूत्व यांनी भरलेला आहे. सातत्याने भारताचा द्वेष करणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नुकतीच ‘तोशाखाना’ प्रकरणी ३ वर्षांची शिक्षा झालेली आहे. आता कारागृहात रहात असतांना इम्रान खान यांना अस्वस्थ वाटत आहे. इम्रान खान यांच्या विरोधात डझनावारी गुन्हे नोंद आहेतच. त्याचे भांडवल विरोधकांनी केले. पंतप्रधान असतांना मिळालेल्या महागड्या भेटवस्तू सरकारच्या तिजोरीत (तोशाखाना) जमा न करता त्या विकून भ्रष्टाचार केल्याचा आरोप खान यांच्यावर होता. आतापर्यंत पाकिस्तानात लष्कराच्या विरोधात भूमिका अथवा निर्णय घेणारा नेता अथवा पंतप्रधान एकतर सत्तेवरून पायउतार होतो किंवा त्याला भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षा होते, हे ठरलेले असते, तसेच खान यांना शिक्षा होण्यामध्ये तेथील सर्वशक्तीमान लष्कराचा हातखंडा आहे. सत्तेवरून हटवल्यानंतर इम्रान खान यांनी ‘लाँग मार्च’ काढून शाहबाज शरीफ आणि लष्कर या दोघांच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण केला होता.
आतापर्यंत पाकिस्तानात झुल्फिकार अली भुट्टोंपासून त्यांच्या कन्या बेनझीर भुट्टोंपर्यंत आणि नवाज शरीफ यांच्यापासून शाहीद खान अब्बासी यांच्यापर्यंतच्या अनेक आजी-माजी पंतप्रधानांना कठोर शिक्षा ठोठावून राजकारणाच्या परिघातून बाहेर फेकण्याचे प्रकार तिथे नियमितपणे घडत आले आहेत. झुल्फिकार अली भुट्टो यांना तर फासावर चढवण्यात आले. लष्कराच्या त्रासाने बेनझीर भुट्टो किंवा नवाज शरीफ हे देश सोडून पळून गेले होते. परवेझ मुशर्रफ यांच्यासारख्या माजी लष्करशहालाही परागंदा व्हावे लागले होते. त्यामुळे इम्रान खान यांच्याविषयी जे घडत आहे, त्यात आश्चर्य असे काहीच नाही. खुद्द खान यांनाही लष्करानेच उभे केले होते. त्या वेळी डोईजड होत असलेले नवाज शरीफ यांच्या विरोधात लष्कराला नवीन नेता हवा होता. तो इम्रान खान यांच्या रूपाने मिळाला होता; मात्र खान यांनी लष्करी व्यय अल्प करण्याचे ठरवले. परिणामी लष्कराचे वजन विरोधकांच्या पारड्यात पडले आणि अविश्वासाचा ठराव संमत करून इम्रान खान यांना पदावरून खाली खेचण्यात आले. लष्कराला नको असलेली भूमिका घेतल्याने खान यांना हटवण्यात आले. राजकीय नेत्यांना आपल्या हुकूमानुसार नाचवण्याचे लष्कराचे धोरण चालू आहे. पाकिस्तानला घात अपघात नवे नाहीत, लष्कराचे बंड नवे नाही, राजकीय नेत्यांना अटक होणे, त्यांची हत्या होणे आणि त्यातून सुडाचे राजकारण रंगणे, हेही नवीन नाही. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार, जाळपोळीचे सत्र चालू होऊन त्यांच्या समर्थकांनी लष्कराच्या मुख्यालयावर चाल केली. एकीकडे पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. पाकिस्तानचे अर्थकारण खालावलेले आहे; परंतु तिथल्या राजकारणाचा पोत पालटण्याची आणि ते देशाच्या भल्याच्या दिशेने जाण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे इम्रान खान यांना झालेल्या शिक्षेच्या रूपाने सिद्ध झाले आहे.
सातत्याने चालणारे भारतविरोधी राजकारण !
माजी पंतप्रधान इम्रान खानच भ्रष्टाचारी नाहीत, तर त्यांची विद्यमान पत्नी बुशरा बिबी आणि पीटीआयच्या इतर नेत्यांवर एका आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी फसलेल्या आस्थापनाला संरक्षण देण्याच्या मोबदल्यात अब्जावधी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पाकमधील या घटनांचा देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास यांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. या देशात पहिला लष्करी उठाव वर्ष १९५८ मध्ये झाला. लष्कराने थेट हस्तक्षेप केला किंवा घडवून आणला, तेव्हा सत्तांतर झाल्याची अनेक उदाहरणे पाकिस्तानात आहेत. धर्माच्या नावावर भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानात लोकशाही कधी रुजलीच नाही नव्हे, तर रुजवताच आली नाही. त्यामुळे लष्कराच्या राजवटीची अनेक दशके या देशाला अनुभवावी लागली. राजकीय नेत्यांच्या हत्या ही तर तेथील रितच झाली होती. त्यामुळेच इम्रान खान यांना केवळ अटक होऊन ३ वर्षांची शिक्षा होणे, ही तशी सौम्य कारवाई म्हणावी लागेल. पाकिस्तानच्या राजकारणातील शत्रूत्व या घटनेमुळे वाढणार आहे आणि त्यात त्या देशाचे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित रहाणार आहेत. पाकिस्तानने जेवढा व्यय आतंकवादी कारवाया आणि संरक्षण यांच्यावर केला आहे, तेवढा व्यय देशाच्या विकासकामासाठी केला असता, तर आज पाकिस्तानची स्थिती वेगळी असती. ‘भारतात इस्लामोफोबिया आहे, मुसलमानांचा छळ होतो’, अशी मुक्ताफळे त्यांनीही उधळली होती. संपूर्ण जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे नाव कमावले आहे किंवा भारताची कीर्ती पसरवली आहे, त्या तुलनेत आतापर्यंत पाकिस्तानात झालेल्या एकाही पंतप्रधानांनी काहीच नाव कमावले नाही, तर उलट ‘आतंकवादी देशा’चे पंतप्रधान म्हणून किताब मिळवला आहे !
पाकिस्तानात अराजक स्थिती असल्याने आणि देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पाकिस्तान नेहमी सौदी अरेबिया, चीन, रशिया आणि अमेरिका यांच्याकडे भीक मागत असतो. पाकिस्तानच्या सत्तेत कुणीही आला, तरी त्यांचा भारतद्वेष कायम असतो. ते त्यांच्या देशात एकमेकांचे विरोधक असतील; पण भारताच्या विरोधावर त्यांचे तेथील राजकारण चालत असते. कोणताही देश कायद्याचे राज्य, शांतता, स्थैर्य असल्याविना प्रगती करू शकत नाही. पाकिस्तानने शांतता पाहिली नाही आणि स्थैर्याचे तर त्या देशाला वावडेच आहे. त्यामुळे एकीकडे त्या देशासमवेतच स्वतंत्र झालेला भारत चंद्रयान ३ अवकाशात सोडून जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने अग्रेसर होत असतांना पाकिस्तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्यावर राजकारणाचे स्वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्नाविना हाल झाले, तरी त्याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्यावर पाकिस्तानात नवा अध्याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.
जनतेचे अन्नाविना हाल झाले, तरी त्याचे कसलेही देणे-घेणे नसलेले पाकिस्तानमधील राजकीय लोकप्रतिनिधी ! |