हिंदु धर्मास लागलेली ‘लव्‍ह जिहाद’ची कीड मुळासकट उखडून टाका ! – धनंजय देसाई, प्रमुख, हिंदु राष्‍ट्र सेना

  • फुलंब्री (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा !

  • आळंद गावात दुकाने बंद ठेवून दिला पाठिंबा !

फुलंब्री तालुक्‍यातील आळंद येथील समन्‍वयकांकडून हिंदु जनआक्रोश मोर्चासाठी व्‍यापारपेठ बंद ठेवण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. याला प्रतिसाद देत येथील हिंदु आणि मुसलमान व्‍यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. वडोद बाजार पोलिसांनी मोठा बंदोबस्‍त तैनात केला होता.

पोलिसांचा कडक बंदोबस्‍त !

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्‍यासह उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, ४४ पोलीस अधिकारी, २४६ पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, १६० एस्.आर्.पी.चे सैनिक, ३० कमांडो, १ अग्‍नीशमन वाहन असा पोलिसांचा तगडा बंदोबस्‍त होता.

छत्रपती संभाजीनगर – मुलींनो, तुम्‍हाला आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले आहे. त्‍यांचे उपकार विसरून ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडू नका. ‘लव्‍ह जिहाद’ ही हिंदु धर्माला लागलेली कीड असून ‘लव्‍ह जिहाद’ नावाचा विषाणू मुळासकट उखडून टाकण्‍यासाठी हिंदूंनी पुढे यावे, असे आवाहन हिंदु राष्‍ट्र सेनेचे प्रमुख श्री. धनंजय देसाई यांनी केले. जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यात मागील २ मासांपासून ‘लव्‍ह जिहाद’च्‍या नावाखाली ४ तरुणींचे विवाह करून धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न उघड झाला होता. त्‍या अनुषंगाने फुलंब्री शहरात ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात ३० जुलै या दिवशी सहस्रोंच्‍या संख्‍येने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्‍यात आला. या मोर्च्‍यानंतर झालेल्‍या सभेत ते बोलत होते.

सकाळी ११ वाजता कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍यास पुष्‍पहार अर्पण करून मोर्च्‍याला प्रारंभ झाला. या वेळी ‘जय श्रीराम’च्‍या घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रत्‍येकाच्‍या हातात भगवे ध्‍वज आणि भगवी टोपी असल्‍याने वातावरणात वीरश्री संचारली होती. यानंतर दुपारी १२.१० वाजता मोर्चा खुलताबाद रस्‍त्‍यावरील सभास्‍थळी पोचला. या वेळी सर्व राजकीय नेत्‍यांनी नागरिकांमध्‍ये बसून भाषणे ऐकली.