अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध ! – शॉर्न क्लार्क

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘सी-२०’ परिषदेत संशोधनाची माहिती सादर !

श्री. शॉन क्लार्क

भोपाळ (मध्यप्रदेश) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक विषयांवर वैशिष्ट्यपूर्ण असे वैज्ञानिक संशोधन केले जात आहे. ‘युनिव्हर्सल ऑरा’ आणि ‘एनर्जी स्कॅनर’ आदी उपकरणे वापरून केलेले हे संशोधन प्राचीन भारतीय शिकवणीशी सुसंगत आहे, तसेच सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी विश्वाला दिलेले ज्ञानही यथार्थ असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे संशोधन आपल्या जीवनावर सूक्ष्म जगताचा कसा प्रभाव पडतो ? याचेही आकलन करून देते, अशी माहिती ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी दिली. नुकतेच भोपाळ येथे ‘सेवा-सेवाभाव, परोपकार आणि स्वयंसेवा’ या कार्यकारी गटाने ‘सी-२०’ परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ‘स्वतंत्र सेवा योगींच्या सर्वोत्तम पद्धत’, म्हणजेच ‘एकल सेवा कार्यकर्ता’, या सत्रात ते बोलत होते. यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी-२०’ परिषदेचे यजमानपद आहे. ‘सी-२०’ ही ‘जी-२०’ परिषदेची नागरी शाखा आहे.

या वेळी श्री. शॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. ‘अध्यात्म हे एक्झिमा, व्यसनाधीनता, मानसिक आजार यांसह आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर मात करण्यासाठी उपयोगी आहे. यज्ञांच्या माध्यमातूनही वनस्पती आणि मानव यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो. संगीतातही हा आध्यात्मिक नियम लागू होतो. संगीताच्या विविध शैली आणि त्यांचा एखाद्याच्या प्रभावळीवर होणारा परिणाम यांविषयी आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. यातून उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांनी गायलेल्या भक्तीगीताने व्यक्तीच्या प्रभावळीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे, तर ‘हेवी मेटल’ संगीतामुळे (जोरजोरात वाजवले जाणारे ‘रॉक  म्युझिक’सारखे संगीत) व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली’, असे श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला इतर ‘सी-२०’ परिषदांमध्येही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ९ जून ते १२ जून २०२३ या कालावधीत अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथे आयोजित केलेल्या परिषदेमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा सहभाग होता.