सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२३ च्या २७१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
रत्नागिरी – अल्पबचत सभागृहात झालेल्या आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मार्चपर्यंत झालेल्या २७१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. नियोजन समितीची बैठक ‘पेपरलेस’ करण्याच्या उद्देशाने सर्व सदस्यांना ‘टॅब’ देण्याचा, तसेच जिल्ह्यातील लांजा, दापोली, खेड आणि कामथे या ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार प्रसाद लाड, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम आणि अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती उपयोजना वर्ष २०२२-२३ मार्चअखेर झालेल्या १७ कोटी ८१ लाख रुपये खर्चास, तसेच आदिवासी उपयोजना वर्ष २०२२-२३ मार्चअखेर झालेल्या १ कोटी १२ लाख ४१ सहस्र खर्चास मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ अंतर्गत ३०० कोटी इतका अर्थसंकल्पीय नियतव्यय संमत झाला असून ९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजना २०२३-२४ साठी १९ कोटी इतका अर्थसंकल्पीय नियतव्यय संमत आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना वर्ष २०२३-२४ अंतर्गत १ कोटी १२ लाख ४६ सहस्र अर्थसंकल्पीय नियतव्यय संमत आहे.
पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीविषयी तातडीने पंचनामे करून साहाय्य द्या. अधिकार्यांनी विशेषत: जिल्हा परिषदेने लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कामांच्या याद्या घेऊन त्याविषयी निधीचे वाटप करावे. आपत्कालीनसाठी ७०३ कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून त्यामधून धूपप्रतिबंधक बंधारे, अंडरग्राऊंड केबलींग, निवारा गृह यामधूनच करण्यात येणार आहे.
आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सी.एस्.आर्. मधून डायलेसिस मशीन मिळवून जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्रे उभारली जातील. त्यासाठी स्टाफ, नर्स प्रशिक्षित करा. जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी सांघिक प्रयत्न करूया!’’