कराची (पाकिस्तान) येथे कट्टरतावाद्यांकडून अहमदी समाजाच्या मशिदीची केली तोडफोड !

पाकिस्तानमध्ये अहमदी समाजाला मानतात मुसलमानेतर !

कराची (पाकिस्तान) – येथे अज्ञातांनी २५ जुलै या दिवशी अहमदी मुसलमानांच्या मशिदीवर आक्रमण करून तिचे मिनार तोडले. पाकमधील मुसलमान अहमदी मुसलमानांना मुसलमान मानत नाहीत. त्यातूनच त्यांच्यावर आक्रमणे होत असतात.

१. या घटनेविषयी अहमदी समाजाचे प्रवक्ते अमीर महमोद यांनी सांगितले की, अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही, तर २ मासांपूर्वी कराचीतील आमच्या २ मशिदींची तोडफोड करण्यात आली होती. पंजाब प्रांतात तर कट्टरतावाद्यांनी पोलिसांनी आव्हान दिले होते, ‘जर येथील मशीद पाडली नाही, तर आम्ही त्याच्यावर आक्रमण करून ती पाडू.’ यामुळे पोलिसांनी आमची मशीद पाडली होती. पाकिस्तान सरकार अहमदी समाजाच्या प्रार्थनास्थळांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे. आम्ही पोलिसांकडे आक्रमणांच्या घटनांविषयी तक्रार करत असतो आणि पोलीसही गुन्हा नोंदवत असतात; मात्र कारवाई केली जात नाही.

२. कराचीतील मशिदीच्या तोडफोडीविषयी पोलीस अधिकारी तारिक नवाज म्हणाले की, आमच्याकडे तक्रार आली असून गुन्हा नोंदवण्यापूर्वी आम्ही चौकशी करत आहोत.

३. वर्ष १९७४ मध्ये पाकिस्तानच्या संसदेने अहमदी समाजाला ‘मुसलमानेतर’ घोषित केले आहे, तसेच त्यांनी स्वतःला मुसलमान समजण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पाकमध्ये अहमदी समाजाची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे.

अहमदिया मुसलमान कोण आहेत ?

इस्लाममध्ये साधारण ७३ जाती आहेत. त्यांतील अहमदिया ही एक जात आहे. त्याची स्थापना वर्ष १८८९ मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केेली होती. इस्लाममध्ये  महंमद पैगंबर हे एकमेव प्रेषित आहेत; मात्र अहमद यांनी स्वतःला प्रेषित मानले होते. ते स्वतःला ‘मसीहा’ (जगाचे कल्याण करण्यासाठी अवतार घेतलेली व्यक्ती) मानत. या  कारणांमुळेच मुसलमान समाज अहमदिया जातीच्या मुसलमानांना ‘मुसलमान’ न समजता ‘काफीर’ (इस्लाम न मानणारे) समजतो.