..तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा


मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – सभागृहात ‘माहितीचे सूत्र’ (पॉईंट ऑफ इन्फर्रमेशन) अंतर्गत विषय मांडतांना सभागृह चालू असतांना जो प्रश्न सार्वजनिक हिताचा असेल, त्याचेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात. अशा प्रकारे सभागृहाचा दुरुपयोग करू नका. सदस्य अशा प्रकारे माहितीची सूत्रे सभागृहात मांडू लागले, तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल, अशी खंत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधीमंडळाचे अधिवेशन चालू झाल्यापासून तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना अनेक असतांना ४-५ प्रश्नांवरच चर्चा होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावल्यास कुणाला अनुमती द्यावी, याविषयी अध्यक्षांपुढे प्रश्न निर्माण होतो. बोलायला दिले नाही, तर सदस्य गोंधळ घालतात. प्रत्येक प्रश्नावर मर्यादित चर्चा झाल्यास सभागृहात अधिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकेल.