गोव्यात ‘उबेर’ टॅक्सीसेवेला अनुमती देणार नाही ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

(उबेर हे ॲपद्वारे टॅक्सीसेवा देणारे आस्थापन आहे.)

पणजी, २५ जुलै (वार्ता.) – गोव्यात ‘उबेर’ला सेवा देण्यासाठी अनुमती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली. ‘उबेर’ या  ‘ॲप’च्या माध्यमातून ‘टॅक्सी’सेवा देणार्‍या आस्थापनाने हल्लीच गोव्यात काही निवडक मार्गांवर ‘टॅक्सी’ सेवेला प्रारंभ केल्याचे वृत्त असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

ते म्हणाले, ‘‘सरकारने यापूर्वीच राज्यात ‘ओला’ आणि ‘उबेर’ या ‘ॲप’च्या माध्यमातून ‘टॅक्सी’सेवा देणार्‍या आस्थापनांना अनुमती न देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकार या निर्णयावर आजही ठाम आहे. ‘टॅक्सी’ व्यवसायावर नियंत्रण आणल्यास या क्षेत्रातील सर्व समस्या सुटणार आहेत. प्रत्येक ‘टॅक्सी ऑपरेटर’ला गोव्यात येऊन व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने अनुमती मागत आहेत’’.

‘उबेर’ने केलेले उल्लंघन ‘आय.टी.’ कायद्याखाली येत नसल्याचे सायबर गुन्हे विभागाचे वाहतूक खात्याला उत्तर !

‘उबेर’ने गोव्यात सरकारच्या अनुमतीविना ‘ॲप’वर आधारित टॅक्सीसेवा चालू केल्याच्या घटनेवरून वाहतूक खात्याने ‘उबेर’च्या विरोधात सायबर गुन्हे विभागात तक्रार प्रविष्ट केल्याची माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी २५ जुलै या दिवशी सकाळी प्रसारमाध्यमाशी बोलतांना दिली.

यानंतर २५ जुलै या दिवशी सायंकाळी सायबर गुन्हे विभागाने ‘उबेर’ने केलेले उल्लंघन ‘आय.टी.’ कायद्याखाली येत नसल्याचे वाहतूक खात्याला कळवले आहे.