कोयना धरणात ६० टी.एम्.सी.हून अधिक पाणीसाठा !

सातारा, २६ जुलै (वार्ता.) – पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाचा जोर कायम असून धरणात प्रतिसेकंद सरासरी ६० सहस्र ३३८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सद्यःस्थितीला कोयना धरणामध्ये ६० टी.एम्.सी.हून अधिक पाणीसाठा झाला आहे.

पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयना, केरा, काजळी, काफना, उत्तरमांड, तारळी या नद्यांसह ओढ्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. नवजा आणि महाबळेश्वर येथील पावसाने उच्चांक गाठला आहे. तालुक्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. कोयना धरण पायथा विद्युत् गृहातील २० मेगावॅट क्षमतेचे एक जनित्र चालू करून त्यातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद १ सहस्र ५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि पूर्वेकडे पडणारा पाऊस यांमुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.