ठाणे, २४ जुलै (वार्ता.) – मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी यांतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाणे येथे वास्तव्य करत होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर २५ जुलै या दिवशी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात ७ दशकांहून अधिक काळ जयंत सावरकर कार्यरत होते. त्यांचा जन्म १९३६ या वर्षी झाला होता. १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. ९७ व्या नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भूषवले होते. जयंत सावरकर यांनी ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्यास्त’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होतेे.