मणीपूरप्रकरणी संसदेत गदारोळ चालूच !

‘आप’चे खासदार संजय सिंह निलंबित !

नवी देहली – मणीपूर येथील हिंसाचारावरून संसदेमध्ये चालू असलेला गदारोळ २४ जुलै या दिवशीही चालू होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तो दिसून आला. या प्रकरणी राज्यसभेत सभापतींनी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना निलंबित केले. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, सरकार मणीपूरच्या प्रकरणी प्रत्येक सूत्रावर चर्चा करण्यास सिद्ध आहे; मात्र विरोधी पक्षांना चर्चाच करायची नाही. त्यांना चर्चेच्या नावाखाली विरोधी भूमिकाच घ्यायची आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, अशा घटनांमध्ये पंतप्रधान संसदेला उत्तर देण्यास बांधील असतात. जगात अशी कोणतीही संसदीय लोकशाही नाही जिथे पंतप्रधानांना भेटण्याची आणि त्यांना प्रश्‍न विचारण्याची संधी मिळत नाही. मोदी यांनी घेतलेली भूमिका विचित्र आहे.

संपादकीय भूमिका 

गेली काही दशके संसदेत गदारोळाविना काहीच घडत नाही, असे चित्र देश आणि जग पहात आहे. जर हे असेच चालू रहाणार असेल, तर संसद भरवण्याचा फार्स तरी का केला जात आहे ?, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?