यवतमाळ, २३ जुलै (वार्ता. ) – जिल्ह्यात ६ दिवसांपासून चालू असलेली पावसाची रिपरिप २० जुलैपासून जोराच्या पावसात रूपांतरित झाली. २१ जुलैच्या रात्री जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठा पाऊस येऊन अनेक तालुक्यात अतीवृष्टी झाली; मात्र यवतमाळ शहरात ३०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. लहान मोठ्या सर्व नद्या, नाले तुडुंब भरले असून सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. शेकडो हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्याने खरवडून नेली. २८० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि ५ सहस्र ३१७ नागरिकांची निवारागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. हानीग्रस्त कुटुंबांना तातडीने पाच सहस्र रुपयांच्या सानुग्रह अनुदानासह धान्याचे वाटप करण्याचे आणि हानी पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.