ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास न्यायालयाची अनुमती !

  • ४ ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचाही आदेश

  • वैज्ञानिक सर्वेक्षणातून ज्ञानवापीची प्राचीनता आणि तेथे शिवलिंग असल्याचे उघड होण्याची शक्यता !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पुरातत्व विभागाला वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली आहे. येत्या ४ ऑगस्टपर्यंत वैज्ञानिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. हिंदु पक्षाकडून या संदर्भात मागणी केली होती. ज्ञानवापीचा वजू खाना (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) वगळून सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या सर्वेक्षणानंतर वजू खाना बंद करण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून ज्ञानवापी किती वर्षे प्राचीन आहे ? आणि ज्ञानवापीत सापडलेेले मोठे शिवलिंग हे किती जुने आहे ?, हे स्पष्ट होणार आहे. वैज्ञानिक सर्वेक्षणामध्ये आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे. मुसलमान पक्षाकडून या मागणीला विरोध करण्यात आला होता. यापूर्वी ज्ञानवापी परिसराचे न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिवक्ता आयुक्तांकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात येथील वजू खान्याजवळ शिवलिंग सापडले होत,. तसेच पश्‍चिमेकडील भिंतीवर हिंदूंची धार्मिक चिन्हे आढळली होती.

१. हिंदु पक्षाचा दावा आहे की, या ज्ञानवापीमध्ये ३ घुमट असून त्याखालील जागेत भिंत बांधून ती बंद करण्यात आली आहे. तेथे जर वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले, तर तेथे देवतांच्या मूर्तींसह काशी विश्‍वेश्‍वराचे मूळ शिवलिंग सापडण्याची शक्यता आहे. येथील मूळ घुमटांवर मुसलमान पद्धतीने नवीन घुमट बांधून मूळ घुमट लवपण्यात आले आहेत. या घुमटांच्या खाली गर्भगृह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

२. या खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, आम्ही ‘सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत हे सर्वेेक्षण करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. यापूर्वी न्यायालय आयुक्तांनाही केलेले सर्वेक्षण याच वेळेत केले होते; कारण या वेळी येथे कुणीही नमाजपठणासाठी येत नाही आणि त्यामुळे अडथळा निर्माण होत नाही. जर या प्रकरणी मुसलमान पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले, तर आम्ही तेथेही त्यांना विरोध करू.

शिवलिंगाच्या सर्वेक्षणावर निर्णय प्रलंबित

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, वजू खान्यामध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी न्यायालयात स्वतंत्र खटला चालू आहे. त्यामुळे आता त्याचे सर्वेक्षण यात होणार नाही. याविषयी सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून त्यावर येत्या २९ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.