सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये यांना आज सुट्टी

  • कोकण रेल्वेच्या गाड्यांना विलंब

सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस; कुडाळच्या भंगसाळ नदीचे पाणी आले रस्त्यावर !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून २० जुलै या दिवशी बहुसंख्य ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. नदी, नाले तुडुंब भरून वहात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूरसदृश स्थितीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. वादळी वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे. वीजपुरवठा, रेल्वे यांसह अन्य वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. समुद्राला उधाण आले असून मोठमोठ्या अजस्त्र लाटा किनार्‍यावर येऊन धडकत आहेत. अतीवृष्टीमुळे प्रशासनाने सतर्कतेची चेतावणी दिली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर २१ जुलै या दिवशी प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे.

भंगसाळ नदीला पूर आल्याने कुडाळ शहरानजीक निर्माण झालेली स्थिती

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झालेली हानी

१. सावंतवाडी झिरंग रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे वीजवाहिन्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ओटवणे देऊळवाडी येथे घरावर मोठे झाड कोसळले. शहरातील बसस्थानक मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले. आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली.

(सौजन्य : ABP MAJHA) 

२. कुणेकेरी येथील पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. आंबोली-बेळगाव मार्गावर धवडकी, माडखोल येथे रस्त्यावर पाणी आल्याने सायंकाळी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. इन्सुली कुडवटेंब येथे पुराचे पाणी महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बांदा बाजारपेठेत तेरेखोल नदीचे पाणी शिरल्याने सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

३. मालवण तालुक्यात सुकळवाड, तसेच अन्य भागांतही रस्ते पाण्याखाली गेले, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. शहर देऊळवाडा, मोबारवाडी, देवबाग आणि सुकळवाड येथे घरांवर झाड पडल्याने हानी झाली. शहर परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बसस्थानकाच्या समोरील मार्गावरील दुकाने आणि घरे यांत पाणी शिरले आहे. तालुक्यातील आचरा, सडेवाडी येथे तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून एका गायीचा आणि २ कोल्ह्यांचा मृत्यू झाला.

कणकवली-आचरा मार्गावर पाणी : रस्ता वाहतुकीस बंद

४. कणकवली तालुक्यात नदी नाले तुडुंब भरून वहातांना दिसून येत आहेत. काही ठिकाणी पूरसदृश स्थितीही निर्माण झाली आहे.

५. वैभववाडी तालुक्यात भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मळावाडी, साळगाव येथे जलमय झालेली शेती

६. दोडामार्ग तालुक्यात प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तिलारी ते दोडामार्ग मार्गावर रस्त्यालगत झाड पडल्याने विजेचे खांब पडून पथदीपांची मोठी हानी झाली. झरे क्रमांक १ मध्ये २ घरांची आणि झरे क्रमांक २ मधील एका घराची, तर उसप येथे एका घराची अंशत: हानी झाली.

७. वेंगुर्ला-सावंतवाडी या मार्गावरील होडावडा येथील मुख्य पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तळवडा बाजारपेठेतही पाणी आले.

८. मौजे पिंगुळीमधील एका कुटुंबातील ५ सदस्य आणि बिबवणे येथून ५ कुटुंबांतील १५ सदस्य यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.

मालवण शहरातील देऊळवाडा येथील प्राथमिक शाळेच्या मागील भागात असलेला डोंगर कोसळत आहे. येथेही दरड कोसळून मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.