‘ऑनलाईन’ कपडे मागवणार्‍या महिलेची ३२ सहस्र रुपयांची फसवणूक

देवगड (सिंधुदुर्ग) – ‘ऑनलाईन’ कपडे (ड्रेस) मागवलेल्‍या जामसंडे येथील महिलेची अज्ञात व्‍यक्‍तीने ‘ऑनलाईन’ व्‍यवहार करतांना ३२ सहस्र १३५ रुपयांची फसवणूक केल्‍याची धक्‍कादायक घटना उघड झाली आहे.

महिलेने ‘ड्रेस डॉट इन’ या ‘फेसबूक साईट’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने कपडे मागवले होते. कपड्यांच्‍या गठ्ठ्यातून (पार्सलमधून) ‘ड्रेस’ऐवजी ‘फॉल’ (साडीला खालच्‍या बाजूने लावलेले कापड) लावलेली साडी आणि चिंध्‍या आल्‍या. तो गठ्ठा त्‍यांनी परत पाठवला आणि ड्रेससाठी दिलेले ७९९ रुपये परत मिळण्‍यासाठी संबंधितांना भ्रमणभाषवरून लघुसंदेश पाठवला. संबंधित व्‍यक्‍तीने सांगिल्‍यानुसार महिलेने एक अर्ज भरला आणि पैसे परत मिळण्‍यासाठी पुन्‍हा संदेश पाठवला. खात्‍यावर पैसे जमा झाले का ? हे पाहिल्‍यावर पैसे परत जमा न होता, खात्‍यातील ३२ सहस्र १३५ रुपये काढून फसवणूक केल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले.