मुलांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर साधनेचे संस्कार करा !
केंद्रशासनाच्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने देशभरात विविध ठिकाणी २ सहस्र ४१६ कोटी रुपये किमतीचे १ लाख ४४ सहस्र किलो अमली पदार्थ १७ जुलै या दिवशी नष्ट केले, तसेच देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर विभागीय परिषदही पार पडली. १ जून २०२२ पासून आतापर्यंत १० लाख किलोहून अधिक (किंमत अनुमाने १२ सहस्र कोटी रुपये) अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थांची संख्या ही गेल्या केवळ दीड मासातील आहे. जप्त करू न शकलेल्या अमली पदार्थांची संख्या किती असेल ? याची कल्पना करता येत नाही. यातून देशात अमली पदार्थांची तस्करी किती व्यापक स्तरावर चालते, हे लक्षात येते. ‘हे जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्यापेक्षा शत्रूराष्ट्रांमध्ये विकून भारताने पैसे कमवावे’, अशी मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये. तस्करीला भ्रष्टाचारामुळे पाठीशी घालण्याचे काम होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २ वर्षांपूर्वी अभिनेते शाहरूख खान यांच्या मुलावर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप करण्यात आला; मात्र तो नंतर खोटा ठरला. अशा घटनाही घडत असतात, हेही लक्षात घ्यायला हवे. गेल्या वर्षी गुजरातच्या मुंद्रा बंदरावरील नौकेवरून २१ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या किमतीचे अमली पदार्थ एकाच वेळी भारतात येणे, हे पहिल्यांदाच देशातील जनतेला लक्षात आले. हे जर पकडले गेले नसते, तर तेही लक्षात आले नसते. अमली पदार्थांची तस्करी केवळ भारतात चालते, असे नाही, तर हे गुन्हेगारी कृत्य संपूर्ण जगभर चालते आणि यामागे लाखो कोटी रुपयांचा व्यवहार चालतो, यातून गुन्हेगारी पोसली जाते. ‘यातून मिळणार्या पैशांचा काही वाटा राजकारण्यांना मिळतो’, असेही म्हटले जाते. एखाद्या देशाने त्याच्या देशात अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केल्याने यावर नियंत्रण येण्याची शक्यता नाही. हे जगाचे सामूहिक दायित्व आहे; मात्र प्रत्येक देश हे दायित्व पार पाडत आहे, असे नाही. अफगाणिस्तान, मेक्सिको आणि म्यानमार या देशांमध्ये जगातील ९५ टक्के अफूचे उत्पादन होते अन् तेथून ते तस्करीमार्गे जगभरात पोचवले जाते. जगातील बहुतेक देशांमध्ये अफूची शेती करण्यावर बंदी आहे. काही ठिकाणी औषधासाठी सरकारी अनुमतीने अफूची लागवड केली जाते. असे असले, तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. अफूची मागणी असल्यामुळे याचे उत्पादन केले जाते आणि ते सर्वत्र पोचवले जाते. विशेषतः अमेरिका आणि आशिया येथे याचे वितरण सर्वाधिक होते. कोकेन या अमली पदार्थाचे उत्पादन कोलंबिया, बोलिविया आणि पेरू या देशांत सर्वाधिक केले जाते. दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंड, तसेच युरोपमध्ये याचे सर्वाधिक सेवन केले जाते. मोरोक्को देशात गांजा, तर म्यानमारमध्ये हेरॉईन हे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात. यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक अमली पदार्थ आहेत, ज्यांची निर्मिती वेगवेगळ्या देशांत होऊन ते जगभरात पोचवले जातात. हे सर्व अवैधरित्याच केले जाते. त्यामुळे या अमली पदार्थांवर प्रतिबंध लावायचा असेल, तर ज्या देशांत यांचे उत्पादन केले जाते, त्या देशांवरच प्रथम जगाने दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. तसे करण्यासाठी संघटित व्हावे लागेल; पण तसे होण्याची शक्यता अल्पच आहे. याचे कारण अमली पदार्थांतून निर्माण होणार्या पैशांतून सत्ताधारी नेत्यांना विकत घेतले जाऊ शकते आणि काही ठिकाणी ते न्यून-अधिक प्रमाणात होतही असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे काही देशांची अर्थव्यवस्था अमली पदार्थांच्या उत्पन्नावरच चालते, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्यामुळे ते देश कधीही यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करणार नाहीत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येण्यापूर्वी अफूची शेती चालू होती आणि त्यातून तालिबानला पैसा मिळत होता. त्यानंतर तालिबानचे सरकार आल्यावर त्याने जगाला दाखवण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये अफूची शेती करण्यावर बंदी घातली. ‘कुणी शेती केली, तर ती जाळून टाकण्यात येईल’, असे घोषित केले; मात्र ही सर्व जगाच्या डोळ्यांत धूळफेक आहे. अफगाणिस्तानमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अफूची शेती होते आणि हा अफू तस्करीच्या माध्यमातून जगभरात पाठवलाही जातो. त्यामुळे अमली पदार्थांवर प्रतिबंध घालणे कठीणच आहे.
मुलांवर साधनेचे संस्कार करा !
‘जगभरात २३ कोटी ४० लाख लोक अमली पदार्थांचे सेवन करतात आणि प्रतिवर्षी २ लाख लोकांचा अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू होतो’, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलेले आहे. अमली पदार्थांचे सेवन अधिकाधिक व्हावे म्हणून जाणीवपूर्वक तरुणांना व्यसनी बनवण्याचा प्रयत्न करणार्या टोळ्याही जगात कार्यरत आहेत. पाकिस्तानने काही दशकांपूर्वी ‘ब्राऊन शुगर’ ज्याला मराठीत ‘गर्द’ असेही म्हटले जाते, ते भारतीय तरुणांनी सेवन करून ते व्यसनी व्हावेत आणि भारताची तरुण पिढी याद्वारे नष्ट व्हावी, असा प्रयत्न केला होता. पंजाबमध्ये हाच प्रकार गेली काही वर्षे पाककडून चालू आहे. ड्रोनच्या साहाय्याने पाककडून पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी केली जाते आणि त्यात भारतीयच सहभागी आहेत. पैशासाठी काहीही करणार्यांची संख्या या देशात अल्प नाही. ‘देशद्रोह मग तो कोणत्याही माध्यमांतून का असेना ते करणारे भारतातच अधिक सापडतील’, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. सरकारने तिच्या यंत्रणांद्वारे अमली पदार्थ जप्त करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो नगण्यच ठरणार, हेच लक्षात येते. ही समस्या सोडवण्यासाठी मागणीच अल्प होण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांवर साधनेचे संस्कार करण्यात आले, तर ते व्यसनाधीनता होण्यापासून वाचतील. केवळ व्यवसाधीनताच अल्प होणार नाही, तर त्याचा अनेक गोष्टींवर सकारात्मक परिणाम होईल.