नवी मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – सागरी सीमा मंच आणि सकल हिंदु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ जुलै या दिवशी अभिवादन दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कान्होजी आंग्रे यांच्या २९४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याच्या हेतूने तसेच ‘एक धाव सागरी संरक्षणासाठी’ या उद्देशाने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळे गाव बंदर ते सारसोळेगाव गणेश मंदिरापर्यंत ही फेरी काढण्यात आली होती, अशी माहिती सागरी सीमा मंचचे नवी मुंबई संयोजक रामनाथ म्हात्रे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पर्यावरण गतीविधी, सामाजिक समरसता, आगरी कोळी उद्योग समूह, शिवशंभू विचार मंच, सावरकर विचार मंच, नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट आदी संस्थांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.
फेरीचे उद़्घाटन कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दिवाळेगाव बंदर येथे करण्यात आले. १०५ स्वयंसेवकांनी नोंदणी करून यात सहभाग घेतला. उलवे, बेलापूर, दिवाळे, करावे, नेरूळ, सारसोळे, वाशी, सानपाडा, शिरवणे, कोपरखैरणे, ऐरोली या भागांतून स्वयंसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
फेरीच्या प्रारंभी मंच्यावर प्रमुख पाहुणे म्हणून रघुजीराजे आंग्रे, प्रांत सहसंयोजक संतोष सुर्वे आणि संघ कार्यवाह नवी मुंबईचे महेश शिंदे अन् रामनाथ म्हात्रे उपस्थित होते. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. रामनाथ म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले, तर चंद्रकात पवार यांनी गीत गायन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जयघोषाने अभिवादन झाल्यावर प्रमुख वक्ते रघुजीराजे आंग्रे (सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज) यांनी छत्रपतींचे आरमार आणि कान्होजी आंग्रे यांच्याविषयी माहिती दिली. त्यानंतर रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ करण्यात आला. सारसोळे येथील गणेश मंदिर येथे फेरीची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.