गोवा : सरकारी कार्यालयांत रोखमुक्त (कॅशलेस) सेवा

गोवा सरकारचा ‘पेटीएम्’ समवेत सामंजस्य करार

(पेटीएम् हे भ्रमणभाषद्वारे पैसे दुसर्‍याच्या खात्यात जमा करणारे ॲप आहे)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरकारच्या वित्त विभागाचे अधिकारी प्रणव भट आणि ‘पेटीएम्’चे मुख्य व्यवसाय अधिकारी अभय शर्मा आणि इतर मान्यवर

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – गोव्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता रोखमुक्त (कॅशलेस) व्यवहार होणार आहेत. गोवा सरकारने ‘वन 97 कम्युनिकेशन्स लि.’ (पेटीएम्) समवेत १३ जुलै या दिवशी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोवा सरकारच्या वित्त विभागाचे अधिकारी प्रणव भट आणि ‘पेटीएम्’चे मुख्य व्यवसाय अधिकारी अभय शर्मा यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

महसूल खाते, वाहतूक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये आता सर्व प्रकारचे दाखले, दस्तऐवज, कर, शुल्क भरणे आदी रोखमुक्त व्यवहार करता येणार !

सरकारी कार्यालयांमध्ये यापुढे देयके किंवा कोणतेही शुल्क यांसाठी रोखीने व्यवहार करावा लागणार नाही. महसूल खाते, वाहतूक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये आता सर्व प्रकारचे दाखले, दस्तऐवज, कर, शुल्क भरणे आदी रोखमुक्त व्यवहार करता येणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आम्ही अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील आर्थिक व्यवहार रोखमुक्त करत आहोत आणि हा त्यातीलच एक भाग आहे. यामुळे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली आहे. ही यंत्रणा सर्वत्र उपलब्ध असल्याने नागरिक त्यांची वीज, पाणी आदींची देयके ‘पेटीएम्’ सुविधेच्या माध्यमातून भरू शकतील.’’