‘पूर्णब्रह्म’ उपाहारगृहाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. जयंती कठाळे या बहुतांश वेळा नऊवारी साडी नेसतात. त्यांच्या उपाहारगृहातही त्या नऊवारी साडीमध्ये अगदी सहजतेने वावरतात. मध्यंतरी एका वाहिनीवरील खाद्यपदार्थ बनवण्याच्या मालिकेमध्ये त्यांचा सहभाग होता. या मालिकेमध्येही त्या नऊवारी साडी नेसून यायच्या, हे विशेष ! सध्याच्या काळात सहावारी साडी काय, पंजाबी पोषाखही परिधान करणेही महिलांना त्रासदायक वाटते. अशा वेळी नऊवारी साडी नेसून सौ. कठाळे या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. त्या म्हणाल्या की, केवळ सणासुदीला नऊवारी नेसण्यापेक्षा नेहमीच ती नेसणे आवश्यक आहे. एकदा त्यांना त्यांच्या उपाहारगृहात एका आधुनिक मुलीने ‘तुमचा हा पोषाख अती होतो’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘उद्या इथे आग लागली, तर मी गाडीवर पाय टाकून येथून जाऊ शकते, तुम्ही काय करणार ?’’ काही लोकांनी त्यांना आरंभी बरीच नावेही ठेवली; परंतु त्यांनी त्यांचा पोषाख सोडला नाही. त्यांच्या मते नऊवारी म्हणजे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. यातून पूर्ण देह झाकला जातो. यात सोवळे आणि शालीनताही येते अन् श्रृंगारही येतो. विचारांना सुदृढ करणारे हे वस्त्र आहे. ते केवळ पेशवाई दाखवण्यासाठी किंवा नाचण्याच्या कार्यक्रमाला नेसण्याची गोष्ट नाही.
गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नऊवारी, महाराष्ट्रीय साडी, गुजराती साडी आणि फ्रॉक यांच्यात वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने विविध प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये नऊवारी हा सर्वांत सात्त्विक पोषाख असल्याचे निष्कर्ष निघाले. हिंदूंच्या स्त्री देवतांचे वस्त्रही हेच आहे. याचा अर्थ एवढे हे वस्त्र प्राचीन आहे. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे यात नऊवार अखंड कापड असल्यामुळे, तसेच त्यातील सुती किंवा रेशमी या धाग्यांमुळेही त्यात सात्त्विकता येण्यास साहाय्य होते. त्याच्या निर्या, पदर आदी गोष्टींमधून देवाचे चैतन्य आकर्षित केले जाऊन नऊवारी साडी नेसणार्या स्त्रीला त्या चैतन्याचा लाभ होतो. काही दिवस सलग नऊवारी साडी नेसल्यामुळे अनेक जणींना होणारे विविध प्रकारचे शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक त्रास न्यून झाले. विदेशी महिलांनीही हा अनुभव घेतला. हिंदूंच्या पारंपरिक वस्त्रांचे महत्त्व या सर्वांतून अधोरेखित होते आणि आपली अस्मिताही जागृत होते !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.