गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा विकसित करण्यासाठी काम करावे ! – मंत्री सुदिन ढवळीकर

विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण

विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण करतांना मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा अभियांत्रिकी विद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थी

पणजी, १० जुलै (स.प.) – गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प विकसित करावा. असा प्रकल्प ही काळाची निकड आहे. राज्यशासन यासाठी निश्चितपणे सहकार्य करेल, असे आवाहन ऊर्जामंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोवा विद्युत् विभागाच्या सहकार्याने बनवलेल्या विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते झाले.

विद्युत् भारवहनातील त्रुटी नेमकेपणाने शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी बनवलेल्या यंत्रणेचे लोकार्पणप्रसंगी संबोधित करतांना मंत्री सुदिन ढवळीकर

(सौजन्य : Prudent Media Goa)

प्रा. जयेश प्रियोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स’ या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ही यंत्रणा डिझाईन, विकसित आणि कार्यान्वित केली आहे.

ही भ्रमणभाषद्वारे नियंत्रित करता येण्यासारखी यंत्रणा पर्वरी येथील मंत्रालयातील विद्युत् भारवहनातील अडचणी नियंत्रित करण्यासाठी बसवण्यात आली आहे. ‘११ किलोवॅट वितरण फीडरवरील सेक्शनलायझर रिमोट कंट्रोलर’, असे या यंत्रणेचे नाव आहे. ही यंत्रणा दोषपूर्ण विभाग ओळखण्यास साहाय्य करेल, तसेच अल्प वेळेत दोष दूर करेल. ज्यामुळे पॉवर सिस्टम नेटवर्कमध्ये सुधारणा होईल.

ही यंत्रणा विकसित केल्याविषयी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे श्री. सुदिन ढवळीकर यांनी अभिनंदन केले.

ऊर्जामंत्री श्री. सुदिन ढवळीकर

ते पुढे म्हणाले,

‘सत्तरी, धारबांदोडा, सांगे, केपे आदी वनक्षेत्र असलेल्या भागांतील वीज वितरणातील व्यत्यय दूर करण्यासाठी भूमीगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम चालू करण्यात आले आहे. त्याचबरोबर काळाची निकड ओळखून शहरातील आणि औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा विकसित करण्याची आवश्यकता आहे.

यातून राज्याला पुष्कळ महसूल मिळतो. या वेळी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी रौनक चारी, फ्रेड बार्बाेझा, ईश्वरी गावकर आणि कु. उज्वला शानभाग यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्युत् विभागाचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विवेक कामत आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.