मानवाधिकाराविषयी भारताला आम्ही सल्ले देऊ शकत नाही ! – अमेरिका

अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचे समन्वयक कर्ट कँपबेल

वॉशिंग्टन – प्रत्येक समाज आणि देश यांच्यासमोर काही अडचणी अन् आव्हाने असतात. यात आपलाही (अमेरिकेचाही) समावेश आहे. कुठलाच देश आदर्श नाही. सर्वांमध्ये काही ना काही उणिवा आहेत. अशात मानवाधिकाराविषयी भारताला आम्ही (अमेरिका) सल्ले देऊ शकत नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचे समन्वयक कर्ट कँपबेल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत केले. भारतातील मानवाधिकार आयोगाविषयी त्यांना विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी हे विधान केले.

कर्ट कँपबेल पुढे म्हणाले,

१. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांत चीनचे सूत्र महत्त्वाचे आहे. तथापि दोन्ही देश या एकाच सूत्राचा विचार करत आहेत असे नाही, तर अन्यही अनेक सूत्रांवर दोघांनाही एकत्रित काम करायचे आहे.

२. रशिया-युक्रेन युद्धात भारताने सैद्धांतिक भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील स्थिती आणि तेथील नागरिकांचे होणारे हाल यांविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या युद्धावरून भारत चिंतित असून रशियाची भूमिका निंदनीय असल्याचे त्याचे मत आहे.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेला उशिरा सुचलेले शहाणपण ! आतापर्यंत भारताविरुद्ध खोटे अहवाल प्रसारित करून भारताची अपकीर्ती करणार्‍या अमेरिकेने क्षमायाचना करावी, अशी  मागणी भारताने केली पाहिजे !
  • आतापर्यंत अमेरिकेने भारताविरुद्ध प्रसारित केलेले सर्व खोटे अहवाल मागे घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच यापुढे असे अहवाल प्रसारित न करण्याची तंबी त्यांच्या देशातील तथाकथित बुद्धीवंतांना, तसेच मानवाधिकार आणि सामाजिक संघटना यांना द्यावी, अशीही मागणी भारताने केली पाहिजे !