मुंबई – महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभधारकांना ओळखपत्र देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. राज्यातील २ कोटी लाभधारकांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्रशासनाची ‘आयुष्यमान भारत आरोग्य’ योजना आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजना यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ९९६ रोगांवरील उपचारांचा समावेश आहे. यांतील मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात आले असून केंद्रशासनाच्या योजनेतील ३२८ नवीन उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे.