फिलिपाईन्स भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र !

फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची भेट !

फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री एनरिक मॅनालो व भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर

नवी देहली – भारत दौर्‍यावर आलेले फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री एनरिक मॅनालो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी २९ जून या दिवशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. फिलिपाईन्स भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. भारतात येण्यापूर्वी एनरिक यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, भारत आणि फिलिपाईन्स यांच्यासाठी चीन हे सर्वांत मोठे आव्हान आहे; कारण त्यामुळे या भागात तणाव निर्माण होत आहे.

एनरिक मॅनालो यांनी २८ जून या दिवशी देहलीतील एका कार्यक्रमात म्हटले की, आम्हाला भारताशी भक्कम संरक्षण संबंध हवे आहेत. चीन आमच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करत असून त्याची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. याविषयी आम्ही त्यास स्पष्टपणे सांगितले आहे. आमचे म्हणणे आहे की, जगातील प्रत्येक सागरी क्षेत्र कुणासाठीही मोकळे असावे. केवळ हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रच का ? येथूनच व्यापार होतो आणि त्यावर कोणत्याही देशाचा अधिकार असू शकत नाही.

भारतासाठी फिलिपाईन्सचे स्थान महत्त्वाचे !

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांमुळे तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई हे देश त्रस्त आहेत. ‘भारत आणि अमेरिका यांनी या छोट्या देशांना पाठिंबा द्यावा आणि चीनचा हस्तक्षेप संपवावा’, यासाठी फिलिपाईन्सचा प्रयत्नशील आहे.

फिलिपाइन्सचे भौगोलिक सामरिक स्थान भारतासाठी महत्त्वाचे आहे. दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात हा एक महत्त्वाचा देश आहे. भारतासमवेतच त्यांच्या सैन्यानेही अनेक वेळा संयुक्त सैनिकी सराव केले आहेत.