|
छत्रपती संभाजीनगर – प्रेमप्रकरणामुळे तरुणी किंवा कौटुंबिक छळामुळे महिला घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक असते; मात्र गेल्या ५ मासांत शहरातील तब्बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे पुरुषांच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे यांसारखी कारणे पुढे येत आहेत. त्यातही यात उच्चशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांतील पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता पुरुषांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानसिक कमकुवतपणा हेच आहे मूळ कारण !
समस्यांना सामोरे न जाणे, समाजाचा दबाव, कुटुंबातील प्रश्न हाताळता न येणे, वाढत्या अपेक्षा, सततचे अपयश आणि तणावपूर्ण नातेसंबंध यांमुळे घर सोडून जाणार्यांचे वाढते प्रमाण हा चिंताजनक विषय आहे. त्यासाठी समस्या हाताळण्याचे कौशल्य, कुटुंबातील संवाद आणि सामंजस्य यांतून हे प्रश्न सोडवता येतात. रागाच्या भरात घर सोडून जाण्यापेक्षा जवळचे मित्र, वरिष्ठ आणि मार्गदर्शक यांच्यासमवेतच्या चर्चेतून मार्ग निघू शकतो. कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांवर समाजाचे अधिक ओझे असते. त्यातून हे प्रकार होत असावेत, असे मत समुपदेशक संदीप शिसोदे यांनी व्यक्त केले आहे.
संपादकीय भूमिकाधर्माचरणी आणि उपासना करणार्या समाजात जीवनातील समस्यांना तोंड देता येईल, असे आत्मबल निर्माण होते ! |