सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

कणकवली – तालुक्यातील कळसुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अन्यथा उपोषण करण्याची चेतावणी कळसुलीसह परिसरातील गावांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना दिली.

 (सौजन्य : Maze Kokan)

आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेविषयी, तसेच अन्य सुविधांविषयी कळसुलीसह बोर्डवे, ओसरगाव, वागदे, कसवण-तळवडे, हळवल, शिरवल आणि शिवडाव ग्रामस्थांनी २३ जून या दिवशी प्रांताधिकारी कातकर यांची भेट घेतली. केंद्रात आधुनिक वैद्य (डॉक्टर) नियुक्त करा. औषध निर्माता, आरोग्य साहाय्यक ही रिक्त पदे तातडीने भरा. येथे पाणीटंचाई असून त्यावर तातडीने उपाययोजना करा. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसर यांची स्वच्छता करा. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून नवीन इमारत उभारण्यात यावी, तसेच येथे सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांच्या सूचीचा फलक लावण्यात यावा, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. (या मागण्यांतून प्रशासनाचा भोंगळ कारभारच चव्हाट्यावर येतो ! – संपादक)

या वेळी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, माजी सरपंच अर्जुन देसाई, रुजॉय फर्नांडिस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी चेतावणी का द्यावी लागते ?