दर्शना पवार हिच्‍या मृत्‍यूची सखोल चौकशी करा !

नगरच्‍या महिला नेत्‍याची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

डावीकडून दर्शना पवार आणि भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे 

अहिल्यानगर – कोपरगाव येथील एम्.पी.एस्.सी. उत्तीर्ण दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कोपरगावच्या माजी आमदार आणि भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काय आहे प्रकरण ?

पुण्‍यातील एका सत्‍कार समारंभासाठी दर्शना ही कोपरगाव येथून पुणे येथे गेली होती. हा सत्‍कार समारंभ पार पडल्‍यानंतर ती पुण्‍याजवळील नर्‍हे परिसरात एका मैत्रिणीकडे रहात होती. १२ जून या दिवशी मैत्रिणीला सिंहगडावर फिरायला जात असल्‍याचे सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने आपल्‍या कुटुंबियांनाही याविषयी माहिती दिली होती. दर्शना हिच्‍यासह तिचा एक मित्रही होता. तिचा ठावठिकाणा न लागल्‍याने कुटुंबियांनी दर्शना बेपत्ता असल्‍याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्‍यात दिली. १८ जून या दिवशी दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्‍या अवस्‍थेत पुणे जिल्‍ह्यातील वेल्‍हे तालुक्‍यात असणार्‍या राजगडाच्‍या पायथ्‍याशी सतीचा माळ या परिसरात सापडला होता. या प्रकरणातील संशयित तरुण हाही दर्शनासह एम्.पी.एस्.सी. परीक्षेची सिद्धता करत होता.