पुणे येथील दत्तमंदिराच्‍या १२६ व्‍या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम !

पुणे – येथील ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्‍ट’च्‍या वतीने यंदाचा ‘लक्ष्मीबाई स्‍मृती’ पुरस्‍कार लोकसभेच्‍या १६ व्‍या अध्‍यक्षा सुमित्रा महाजन, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्‍या आणि ज्‍येष्‍ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना प्रदान करण्‍यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, २५ सहस्र रुपये रोख, महावस्‍त्र असे पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे, अशी घोषणा ट्रस्‍टचे अध्‍यक्ष श्री. युवराज गाडवे यांनी केली. दत्तमंदिराच्‍या १२६ व्‍या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्‍यात आले होते.

मंदिराचे कार्यकारी विश्‍वस्‍त डॉ. पराग काळकर म्‍हणाले, ‘‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्‍मृती’ पुरस्‍काराचे यंदा ९ वे वर्ष आहे. महिला सबलीकरण, साक्षरता, सामाजिक बांधिलकी आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्‍याविषयी या महिलांना सन्‍मानित करण्‍यात येते.’’