योग हा जागतिक आत्मा बनला ! – पंतप्रधान मोदी

जगभरात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा !

नवी देहली – भारताच्या पुढाकाराने २१ जून २०१५ पासून चालू झालेला आंतरराष्ट्रीय योग दिवस यंदा नवव्यांदा साजरा केला गेला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौर्‍यावर असल्याने त्यांनी ट्विटरद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ते  म्हणाले, ‘‘योग हा जागतिक आत्मा बनला आहे. प्रत्येक वर्षी योग दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांमध्ये कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात उपस्थित असतो. विविध दायित्वांमुळे मी सध्या अमेरिकेत आहे. आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक मोठा कार्यक्रम होत आहे. मी त्यात सहभागी होईन.’

१. या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय हा ‘वसुधैव कुटुम्बकम्साठी योग’, असा आहे.

२. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोच्चि (केरळ) येथे ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ या लढाऊ जहाजावर भारतीय नौदलाच्या सैनिकांसह योग केला.

३. लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावाच्या काठावर भारतीय सैन्याच्या सैनिकांनी योगासने केली.

४. २० जून या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले, ‘‘योग केवळ शरीर आणि मन जोडत नाही, तर जगभरातील लाखो लोकांना जोडतो. योग हा चिंता न्यून करून मानसिक आरोग्य सुधारण्यास साहाय्य करतो.’’

५. २७ सप्टेंबर २०१४ या दिवशी प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात प्रत्येक वर्षी योग दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो अवघ्या तीन मासांत मान्य करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

‘योग’कडे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सांगितलेली योगासने या मर्यादेपर्यंतच जग पहाते. प्रत्यक्षात ‘जीव आणि शिव यांचे मिलन म्हणजे योग’, म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती करण्याचे प्रयत्न म्हणजे योग’, ही भारतीय अध्यात्माची सर्वोच्च शिकवण यापुढे जागतिक स्तरावर रुजण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा !