रथयात्रेवर बंगाल पोलिसांनी निर्बंध घालणे, हा धार्मिक प्रथेत हस्तक्षेप ! – कोलकाता उच्च न्यायालय

कोलकाता – या वर्षी श्री जगन्नाथ रथयात्रेच्या वेळी बंगालमधील संकरेल, हावडा येथे रथयात्रा मिरवणुकीला अनुमती न दिल्याविषयी कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांची कानउघाडणी केली. राज्य पोलिसांनी रथयात्रेवर घातलेले निर्बंध म्हणजे धार्मिक प्रथेमध्ये हस्तक्षेप करणे आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांनी म्हटले आहे की, श्री जगन्नाथ देवतेला रथातून नेऊ न देण्याचा आदेश देणे अत्यंत अयोग्य आहे. याद्वारे रथयात्रेचा उद्देश आणि हेतू नाकारला गेला आहे. अनेक शतकांपासून लोक आनंदाने या रथयात्रेत सहभागी होत आहेत आणि सक्रीयपणे रथयात्रेला पाठिंबा देत आहेत. आजपर्यंत देशातील कुठल्याही राज्यात अशा प्रकारचा धार्मिक प्रथेमध्ये हस्तक्षेप झालेला नाही. भारतात रथोत्सवाची प्रथा सहस्रावधी वर्षांपासून चालू आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

बंगाल पोलिसांनी रथयात्रेवर निर्बंध घातल्यानंतर याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका निकाली काढतांना न्यायालयाने नमूद केले की, या धार्मिक कार्यात काही समाजकंटक व्यत्यय आणण्याची शक्यता असल्यास पोलिसांनी त्याचे निराकरण करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !