बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करावा ! – अजय सिंह, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड हिंदू फेडरेशन

श्री. अजय सिंह , आंतरराष्ट्रीय अध्यक्ष  ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन

रामनाथी, २० जून (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अतिशय दयनीय आहे. तेथे हिंदु मुलींवर प्रतिदिन बलात्कार होत आहेत, मंदिरे तोडली जात आहेत, तसेच हिंदूंच्या भूमी लुटल्या जात आहेत. हिंदू अक्षरश: गुलामीचे जीवन जगत आहेत. ते कमकुवत आणि भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नाही. साध्या भोळ्या हिंदूंवर आसूड ओढणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगही याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यामध्ये बांगलादेशातील धर्मांधांवर चाबूक उगारायचे धाडस नाही.

आज या पीडित हिंदूंना मानसिक आणि शारीरिक बळ देण्यासमवेतच राजकीय बळाचीही आवश्यकता आहे; पण भारत सरकार त्यांच्यासाठी काही करत नाही. अल्पसंख्य हिंदूंच्या समस्या सोडवणे दूर राहिले, तेथे अद्याप अल्पसंख्यांक मंत्रालयाची निर्मितीही झालेली नाही. दुसरीकडे भारतामध्ये म्यानमारमधून आलेल्या कोट्यवधी रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने तेथील सरकारशी चर्चा केली आणि त्यांना निवास आदी व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तत्कालीन परराष्ट्र सचिव आणि आताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी प्रयत्न केले. अशाच प्रकारचे प्रयत्न आपण बांगलादेशातील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताने बांगलादेशावर दबाव निर्माण केला पाहिजे, असे उद्गार ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजय सिंह यांनी काढले. ते  ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी)  उपस्थितांना संबोधित करत होते.

युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात लोक ख्रिस्ती धर्मापासून दूर जात आहेत. तसेच ते हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. त्यामुळे तेथे हिंदु धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. – श्री. अजय सिंह

हिंदु जनजागृती समितीचे निराळेपण !

‘प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी देश-विदेशातून शेकडो हिंदुत्वनिष्ठ उपस्थित आहेत. त्यांची निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था करण्यात हिंदु जनजागृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी झोकून दिले आहे. अनेक संघटनांना एकत्र आणून त्यांचे अधिवेशन भरवणे, ही साधी गोष्ट नाही.’ – श्री. अजय सिंह