हिंदूंचे खरे युद्ध विरोधकांच्या खोट्या ‘नॅरेटिव्हज्’च्या (कथानकाच्या) विरोधात !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले मार्गदर्शन

‘नॅरेटिव्हज्’चे युद्ध म्हणजे नेमके काय ?’, हे समजून घेण्यासाठी आपण मागील काळातील काही घटना आणि त्यांचा कालावधी यांचा विचार करूया !

अ. वर्ष २०१४ मध्ये भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यावर अचानक वर्ष २०१५ मध्ये सर्व माध्यमांतून असहिष्णुता वाढत असल्याची चर्चा देशभरात मोठ्या प्रमाणात चालू झाली. अभिनेते आमीर खानने सांगितले, ‘‘असहिष्णुतेच्या भीतीने त्याची पत्नी भारत सोडण्याचा विचार करत आहे.’’

आ. वर्ष २०१५ मध्ये महंमद अखलाक नावाच्या मुसलमानाची गोमांसावरून झालेल्या हत्येनंतर ‘मॉब लिंचिंग’च्या (समूहाने केलेली हत्येच्या) कारणाने भारतातील पुरोगामी लेखक, साहित्यिक, अभिनेते यांनी ‘पुरस्कार वापसी’ची घोषणा चालू केली.

इ. केंद्र सरकारने केलेल्या ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा)च्या विरोधात मुसलमानांनी नोव्हेंबर २०१९ पासून शाहीनबाग येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन चालू केले आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याच्या प्रारंभी देहलीमध्ये नियोजित पद्धतीने दंगली घडवण्यात आल्या. त्यातून ‘भारतात अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार केले जातात ?’, असे चित्र जगभरातील माध्यमांच्या पुढे उभे करण्याचे षड्यंत्र उघड झाले.

ई. त्यानंतर भारतात हिंदू आक्रमक होत असून हिंदूंकडून ‘जय श्रीराम’ची घोषणा ही ‘युद्ध-घोषणे’सारखी (वॉर क्राय) वापरली जात आहे. भारतातील मुसलमान भीतीच्या छायेखाली रहात आहेत, अर्थात् ‘डरा हुआ मुसलमान’ची मोहीम चालू करण्यात आली.

उ. इंग्लंडमधील ‘बीबीसी’ वाहिनीने २० वर्षांपूर्वी झालेल्या वर्ष २००२ च्या गुजरात दंगलींच्या संदर्भात माहितीपट बनवून त्यात मोदींच्या काळात मुसलमानांवर कसे अत्याचार झाले, याचा पुन्हा नव्याने प्रचार करण्याचा प्रयत्न केला. वास्तविकरित्या भारतातील सर्वाेच्च न्यायालयाने मोदींच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगून त्यांना त्या आरोपांतून मुक्त केले होते.

ऊ. हिंदू साधू-संतांच्या धर्मसंसदेत, सभांमध्ये अल्पसंख्यांकांच्या विरोधात द्वेष पसरवणारी प्रक्षोभक भाषणे (हेट स्पीच) केली जातात; म्हणून त्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली जाते.

वरील सर्व घटनांमधील भाजप, मोदी आणि राजकारण यांना वगळून आपण विचार करूया. या घटना वेगवेगळ्या जरी दिसत असल्या, तरी त्यांतून केंद्रात हिंदुत्वनिष्ठ पक्षाची सत्ता आल्यावर समाजात असहिष्णुता वाढण्यास पोषक वातावरण बनवले जाते, अल्पसंख्यांकांवर अत्याचार चालू होतात, मुसलमानांच्या समूह हत्या केल्या जातात, सरकार पक्षपाती भूमिका घेऊन मुसलमानांच्या विरोधात कायदे बनवते, दंगली घडवून अल्पसंख्यांकांना मारले जाते, अशी विविध प्रकारची कथानके रचून त्यांचा जगभरात प्रचार केला जात होता; मात्र त्या सर्व कथानकांचा एकत्रित अभ्यास केल्यास लक्षात येते की, त्या सर्व कथानकांचे बीज, संकल्पना, धोरण होते – ‘जागतिक स्तरावर हिंदूंना असहिष्णु, तसेच आक्रमक ठरवणे.’ या कथानक बिजालाच ‘नॅरेटिव्ह’ म्हटले जाते. या ‘नॅरेटिव्ह’च्या प्रचारातून एकदा का हिंदूंना आक्रमक, असहिष्णु ठरवले की, मग भारतीय मुसलमानांना पीडित असल्याचे दाखवता येते. त्यामुळे फाळणीच्या काळात, काश्मीर-बंगाल या राज्यांत मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांवर पांघरुण घालता येते, दंगलींमध्ये मुसलमानांना अल्पसंख्यांक म्हणून संरक्षण मिळते, मुसलमानांच्या जिहादी मानसिकतेला बळ मिळते, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदु नेते आणि संघटना यांवर बंधने घालता येतात, जागतिक स्तरावरील व्यापारी देश आर्थिक निर्बंध घालतात, तसेच प्रत्यक्षात अत्याचार सहन करणार्‍या हिंदूंवरच दबाव निर्माण केला जातो. हे सर्व परिणाम लक्षात घेतल्यास ‘नॅरेटिव्ह’च्या दृष्टीने विचार करणे का महत्त्वाचे आहे ?’, हे आपल्या लक्षात आले असेल. एकप्रकारे हा बौद्धिक स्तरावरचा मुख्य लढा आहे.

आपण हिंदुत्वनिष्ठ काय करतो, तर या प्रत्येक घटनेचा स्वतंत्ररित्या विचार करतो आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया म्हणून आंदोलन, मोर्चा आदी स्थूल कृती करतो; परंतु त्यामागील ‘नॅरेटिव्ह’ धोरण यांचा अभ्यास केलेला नसल्याने त्यावरील उपाय आपल्या लक्षातच येत नाहीत. जशी छातीवर कितीही मलमपट्टी केली, तरी हृदयविकाराच्या मूळ समस्येवर तो उपाय होऊ शकत नाही, तसेच या समस्यांमागील ‘नॅरेटिव्ह’ समजून घेतले नाही, तर हिंदु राष्ट्राच्या आड येणार्‍या समस्यांना आपण समूळ नष्ट करू शकणार नाही. त्यामुळे या दृष्टीने चिंतन करण्याची आवश्यकता आहे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीचा बौद्धिक लढा आपण जिंकू शकू. या दृष्टीने आज या ‘नॅरेटिव्ह’च्या विरोधातील बौद्धिक लढ्याची काही सूत्रे समजून घेऊया. 

श्री. रमेश शिंदे

१. भारताला युद्ध अडीच आघाड्यांवर लढावे लागणार आहे !

‘जगातील अन्य देशांना केवळ बाह्यशत्रूंशी लढावे लागते; मात्र भारताला अडीच (२.५) आघाड्यांवर युद्ध लढावे लागणार आहे’, असे भारताचे दिवंगत माजी सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी स्पष्टपणे म्हटले होते. त्यात एक आघाडी पाकिस्तान, तर दुसरी चीन यांच्या विरोधातील आहे; मग उरलेली अर्धी आघाडी म्हणजे कोण ? तर भारतविरोधी कारवायांत सहभागी देशातील नक्षलवादी, जिहादी आतंकवादी, साम्यवादी विचारवंत, जातीय संघटना, खलिस्तानी, पुरोगामी, डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना, असे अंतर्गत शत्रू. हे शत्रू ‘नॅरेटिव्ह’च्या आधारे बौद्धिक स्तरावर लढत असतात. या बाह्य आणि अंतर्गत शत्रूंच्या दोन आघाड्यांवर युद्ध करण्यामध्ये भेद कसा आहे, तर भारताचा सैनिक पाकिस्तानी किंवा चिनी शत्रूच्या डोक्यात गोळी मारू शकतो; परंतु आपण ‘सेक्युलरवाद’ (निधर्मीवाद) आणि ‘समाजवाद’ हे शब्द राज्यघटनेत घातलेले असल्यामुळे या अंतर्गत शत्रूंशी तशा प्रकारे लढता येत नाही. याचे कारण म्हणजे त्यांनाही भारतात नागरिकत्वाचे सर्व अधिकार राज्यघटना देते. त्यामुळे या अधिकारांचा वापर करून ते विद्यापिठांत ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा देऊ शकतात, भारताच्या राष्ट्रगीताला विरोध करून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणू शकतात, त्यांच्यासाठी सर्वाेच्च न्यायालय पहाटे उघडू शकते, ते देशविरोधी शत्रूंना आश्रय देऊ शकतात, ते सैनिकांच्या हत्या करू शकतात, भारताच्या विरोधात प्रचार करणारा लेख लिहू शकतात, व्याख्याने देऊ शकतात; मात्र तरीही सेक्युलरवादाच्या ‘नॅरेटिव्ह’मुळे आम्ही प्रतिज्ञा करत रहातो – ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यांचे सुख आणि समृद्धी यांतच माझे कल्याण आहे.’ माझ्या मातृभूमीच्या विरोधात लढणारा हा माझा बांधव कसा होऊ शकतो ? भारतात काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना काश्मीरमधून विस्थापित करण्यात आले, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी एकही सेक्युलरवादी पुढे आला नाही; मात्र देशात अवैधरित्या घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय सरकारने घेतल्यावर त्वरित सर्वाेच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली, ‘रोहिंग्यांच्या मानवाधिकारांचे रक्षण व्हावे आणि त्यांना भारतात आश्रय मिळावा.’ यातून लक्षात येईल की, या अंतर्गत शत्रूंच्या अर्ध्या आघाडीशी लढणे किती कठीण आहे !

२. भाषिकवादाचे ‘नॅरेटिव्ह’

‘नॅरेटिव्ह’च्या संदर्भातील सध्याचे सर्वांत प्रचलित उदाहरण, म्हणजे दक्षिण आणि उत्तर भारतीय यांच्यातील भाषिकवादाचे ‘नॅरेटिव्ह’ ! दक्षिणेतील काही राज्यांत हिंदी भाषिक भारतियांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या. आता या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येईल की, त्या भाषिकवादात उर्दू भाषिक मुसलमानांना मारहाण झाली का ? तर नाही ! मार खाणारे आणि त्यांना मारणारेही हिंदूच होते ! हिंदूच हिंदूंना मारत होते, याचे कारण धर्मापेक्षा प्रांत आणि भाषा यांच्या वादाच्या ‘नॅरेटिव्ह’ला राजकारण्यांनी दिलेले महत्त्व ! उत्तरेतील हिंदी भाषिकांना दक्षिण भारतात त्या राज्याची भाषा न बोलता हिंदीचा वापर करण्याला, म्हणजे बाहेरची भाषा वापरण्याला विरोध केला जातो. आता हेच दक्षिण भारतीय जेव्हा राजधानी देहलीत किंवा उत्तर भारतातील अन्य शहरांत जातात, तेव्हा कोणती भाषा बोलतात, तर ते अभिमानाने ‘इंग्रजी’त संवाद साधतात. दक्षिणेतील राज्यांत भारतीय हिंदी भाषा बाहेरची मानली जाते, तर संपूर्ण देशात ब्रिटिशांनी लादलेली त्यांची ‘इंग्रजी’ भाषा बाहेरची का मानली जात नाही ? उलट आमचे लोक अभिमानाने मुलांना इंग्रजी बोलता यावे; म्हणून ‘कॉन्व्हेंट’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वाटेल ते करतात ! म्हणजे भाषिकवादाच्या ‘नॅरेटिव्ह’मुळे स्वतंत्र भारतात हिंदी, बिहारी, अवधी, भोजपुरी या संस्कृत आधारित भाषा बाहेरच्या ठरवल्या जातात, तर विदेशी ब्रिटिशांनी लादलेली ‘इंग्रजी’ आमच्या देशात अभिमानाने वापरली जाते.

याचे मूळ कारण आहे, भारतात इंग्रजांनी लादलेले ‘आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांता’चे ‘नॅरेटिव्ह’ ! उत्तरेतील आर्यांनी बाहेरून येऊन दक्षिणेतील द्रविड लोकांना गुलाम बनवले, या खोट्या सिद्धांताच्या बिजामुळे आज भाषिकवादाचे परिणाम दिसत आहेत. जगभरातील मानववंश शास्त्रज्ञांनी इंग्रजांचा हा सिद्धांत खोटा, थोतांड असल्याचे पुराव्यांसह सिद्ध केले आहे; मात्र भारतात या ‘नॅरेटिव्ह’च्या आधारे दक्षिणेतील हिंदूंची मानसिकताच अशा पद्धतीने बनवली गेली की, ते आजही स्वतःला ‘हिंदु’ म्हणण्यापेक्षा ‘द्रविड’ म्हणवतात. दक्षिणेतील प्रमुख राजकीय पक्षांच्या नावातच ‘द्रविड’ शब्दाचा उल्लेख आहे. यातून लक्षात आले असेल की, ‘नॅरेटिव्ह’ तुमच्या मनात, बुद्धीत शिरून तेथे विकृती निर्माण करण्याचे कार्य करते. तुम्हालाच तुमच्या लोकांच्या विरोधात शत्रुत्वाची भावना निर्माण करते. त्यामुळे जोपर्यंत हे ‘नॅरेटिव्ह’ पालटण्याचा प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत हिंदूच हिंदूंच्या आणि भारतीयच भारतियांच्या विरोधात लढत रहाणार आहेत.

३. हिंदु राष्ट्राच्या विरोधातील नवीन ‘नॅरेटिव्ह’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अनेक ठिकाणी वक्तव्य करतांना सहजपणे बोलतात, ‘इंडिया इज नॉट नेशन, इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स’, म्हणजेच ‘भारत हे राष्ट्र नाही, तर तो राज्यांचा एक समूह आहे.’ हा विचारच भारताच्या ‘अनेकतेत एकता’ या वैशिष्ट्याला आणि हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घातक आहे. राष्ट्रालाच ‘नेशन’ म्हटले जाते आणि राष्ट्र हे परंपरा, संस्कृती, उत्सव, भाषा, धर्मग्रंथ यांच्या आधारे मान्यता पावते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील मकरसंक्रातीचा उत्सव ! भारतात कुठे त्याला संक्रांत, तर काश्मीरमध्ये शिशुर संक्रांती, पंजाबमध्ये लोहडी, हरियाणात माघी, राजस्थान आणि गुजरात येथे उत्तरायण, तमिळनाडूत पोंगल, तर आसाममध्ये भोगाली बिहु म्हणून तो उत्सव साजरा केला जातो. येथे नावे निरनिराळी असली, तरी देशभरात संक्रांत एकाच दिवशी साजरी केली जाते. त्यातून भारत हे एक अखंड राष्ट्र असल्याचे सिद्ध होते; मात्र राहुल गांधी ‘इंडिया इज नॉट नेशन’, असे म्हणून ते भारताच्या ‘राष्ट्र’ या संकल्पनेलाच आव्हान देत आहेत. जर भारत राष्ट्रच नाही, तर आपण त्याला हिंदु राष्ट्र कसे बनवणार ? यातून त्यांचे षड्यंत्र लक्षात घ्यायला हवे.

ते पुढे म्हणतात, ‘‘इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स’’, म्हणजेच ‘भारत म्हणजे राज्यांचा एक समूह आहे.’ समान विचार, परंपरा, संस्कृती नसणार्‍या राज्यांच्या समुहातून राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. काही दशकांपूर्वी रशिया (यू.एस्.एस्.आर्.) हा अशाच राज्यांचा समूह होता; मात्र केवळ राज्यांचा समूह एकसंध राहू शकत नसल्याने रशियाचे तुकडे झाले. (रशियाचे तुकडे होऊन झालेल्या देशांची नावे : अर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिझिस्तान, लात्व्हिया, लिथुएनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, उझबेकिस्तान) रशियाच्या समूह राज्यांची संकल्पना भारताला लागू होत नाही; कारण भारतात राज्ये निरनिराळी असली, तरी देशभरातील परंपरा एकच आहे. भारतात गंगेची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी गौरीकुंडाच्या अगोदरचे गंगाजल घेऊन ते तामिळनाडूतील रामेश्वरमच्या सागरात विसर्जित करावे लागते आणि मग रामेश्वरमचे जल घेऊन ते गंगा नदीत विसर्जित करावे लागते.

उत्तर भारतात ज्या गंगेला पवित्र मानले आहे, त्याच गंगेला दक्षिण भारतातही पवित्रच मानलेले आहे. आद्यशंकराचार्यांनी निर्माण केलेले ४ मठ भारताच्या चार दिशांना आहेत. उत्तर भारतात विष्णु अवतार प्रभु श्रीरामाला मानणार्‍यांची संख्या अधिक आहे; मात्र त्याच श्रीरामाने रामेश्वरम् येथे शिवलिंगाची पूजा केलेली आहे. त्यामुळे शैव-वैष्णव हा भेद येथे दिसत नाही. तसेच आर्य-द्रविड भेदही दिसत नाही. असे असतांना भारताला केवळ राज्यांचा समूह मानणे किती मूर्खपणाचे आहे, हे लक्षात येईल. आज भारताला केवळ राज्यांचा समूह मानले, तर ‘खलिस्तानवादी’ या राज्यांच्या समुहातून त्यांचे राज्य वेगळे करून मागू लागतील. राहुल गांधी अशी निवळ मूर्खपणाची वक्तव्ये करत नाहीत, तर विभाजनवादी मानसिकतेला बळ देण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला विरोध करण्यासाठी या ‘नॅरेटिव्ह’चा वापर करत आहेत. त्यांच्या ‘नॅरेटिव्ह’ला साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या ‘इकोसिस्टम’ला (विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवण्यासाठी केलेली कार्यप्रणाली) बळ देण्याचे कार्य करते. त्यामुळे राहुल गांधींच्या या वक्तव्यावर चॅनेलवर चर्चा, बातम्या, सोशल मिडियावर ट्रेंड आदी करून लगेचच तो विषय देशातील सर्व विभाजनकारी शक्तींपर्यंत पोचवला जातो; म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करावयाचे झाल्यास आपल्याला या ‘नॅरेटिव्ह’च्या विरोधातील भूमिका प्रखरतेने मांडून हे बौद्धिक युद्ध जिंकावे लागेल.

४. मुसलमानांकडून केले जाणारे नवीन ‘नॅरेटिव्ह’ !

मौलाना अर्शद मदनी

आता मुसलमानांनी चालू केलेल्या एका नव्या ‘नॅरेटिव्ह’च्या संदर्भातील एक उदाहरण येथे देत आहे. मौलाना (इस्लामचे अभ्यासक) अर्शद मदनी म्हणतात, ‘‘इन्हीको तो हम अल्ला कहते है । इन्हीको तुम ईश्वर कहते हो, इसीको तो हम अल्लाह कहते है । फारसी बोलने वाले खुदाह कहते है । अंग्रेजी बोलनेवाले God कहते है । इसका मतलब ये है, के मनु एक अल्लाह, एक ‘ॐ’ याने एक अल्लाह को पुजते थे ।’’

या भाषणातील त्यांच्या दोन वाक्यांमध्ये ते म्हणतात, ‘‘एक – अल्लाह म्हणजेच ईश्वर आहे आणि दुसरे – मनुने कुणाची उपासना केली, तर अल्लाहची उपासना केली.’’

दुसरीकडे मौलाना मेहमूद मदनी म्हणतात, ‘‘ध्यान करीएगा, साथ ही इस धरती की खासियत ये है, की ये खुदा के सबसे पहले पैंगबर अबुल बशर ए सैयदना आदमवाले इस्लाम की सलतनी है । आप यहीं तशरीफ लाए । ये धरती इस्लाम की ताए पैदाईश है । ये मुसलमानों का पहला वतन है । इस्लाम बाहरसे आया हुआ कोई मजहब है, ये सरासर गलत है । यह भारत का सबसे पुराना मजहब है ।’’

यात मौलाना म्हणतात, ‘‘भारत हा मुसलमानांचा पहिला देश आहे. इस्लाम बाहेरून आलेला एखादा मजहब (धर्म) आहे, असे तुम्ही मानत असाल, तर ते चुकीचे आहे.’’ याचाच अर्थ मौलाना म्हणत आहे, ‘ही भूमी तर आमचीच आहे आणि इस्लाम बाहेरून आलेला नाही, तर भारतातीलच सगळ्यात प्राचीन पंथ आहे. ’’

ही वक्तव्ये करणारे कोण आहेत ? तर ते देवबंदच्या ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख आहेत. हीच जमियत उलेमा-ए-हिंद भारतातील कायद्यांना न मानता, इस्लामी वर्चस्व निर्माण करण्यासाठी सहस्रो रुपये घेऊन शाकाहारीसह सर्व पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देऊन समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य करत आहे.

त्याही पुढे जाऊन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणतात, ‘‘तेरे राम को हमारे नबी ने भेजा हुआ है ।’’ श्रीरामाला, श्रीरामजन्मभूमीला अखंड विरोध करणारे आज म्हणत आहेत की, श्रीरामालाही इस्लाममधील प्रेषितांनी पाठवले ? पुढे मौलाना अर्शद मदनी म्हणतात, ‘Allah and Om are one and same’, म्हणजे अल्लाह आणि ॐ एकच आहेत. ‘ओम’मध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीनही देवता आहेत अन् इस्लाम भारताचा नवीन मजहब आहे, म्हणजे अल्ला आणि ओम एक आहे अन् ओममध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीनही देवता आहेत. त्यापुढे ते म्हणत आहेत की, इस्लाम हा भारताचा नवीन मजहब आहे. अर्थात् आता ते इस्लामला राज्याच्या अधिकृत धर्माची मान्यता देऊ पहात आहेत. भारताच्या राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, ‘‘ज्या पंथांची स्थापना भारतभूमीत झाली नाही, ते विदेशी पंथ आहेत. इस्लामच्या मक्का-मदिना सौदी अरब देशात आहेत. ख्रिस्त्यांचे, तसेच ज्यूंचे पवित्र स्थान इस्रायलमधील जेरुसलेम आहे. त्यामुळे मुसलमानांना हिंदू मानता येणार नाही. त्यांना राज्यात अल्पसंख्यांक म्हणून अधिकार असतील.’’

यात लक्षात घेतले पाहिजे की, कालपर्यंत जे मौलाना श्रीराम, ब्रह्मा, विष्णु यांना मानणे इस्लामनुसार शिर्क, म्हणजे ‘महापाप’ मानत होते, श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करत होते, आता अचानक ते त्यांना वंदनीय मानू लागले आहेत ? हे अचानक घडत नाही, तर ते नवीन ‘नॅरेटिव्ह’ आहे. त्यामागे त्यांचे षड्यंत्र आहे की, कोणत्याही वादाच्या प्रसंगात ‘तुम्हा मुसलमानांना इस्लाम, हिरवा रंग हवा आहे ना, तर पाकिस्तानात जा’, असे बोलले जाते. त्यातून ‘मुसलमानांचा भारतावर अधिकार नाही’, अशी मानसिकता सिद्ध होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी ‘भारत ही इस्लामची पहिली भूमी आहे. हिंदूंच्या देवतांनाही अल्लाच्या प्रेषितांनीच पाठवले आहे’, असे ‘नॅरेटिव्ह’ मांडायला प्रारंभ केला आहे. यातून ते इस्लामला हिंदु धर्माच्या प्राचीनतेशी जोडत आहेत. इस्लाम हा १४०० वर्षांपूर्वीचा एकेश्वरवादी पंथ असतांना त्याला ते लाखो वर्षांचा इतिहास, परंपरा असणार्‍या हिंदु धर्माशी जोडत आहेत आणि ‘हिंदूंच्या देवतांनाही इस्लामी प्रेषितांनी पाठवले’, अशी मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मौलाना मदनीच्या या वक्तव्याच्या संदर्भात हिंदु साधू-संतांनी आक्षेप घेतल्यावर मौलाना मदनीने सांगितले की, ‘मैंने तो मेरा मुद्दा रखा, आप इस पर डिबेट करो, चर्चा करो.’ म्हणजे कोणतीही थाप मारायची आणि त्यावर चर्चा करायला सांगायची, हेसुद्धा एक षड्यंत्रच आहे. मौलाना मदनीच्या मुद्यावर चर्चा, डिबेट करणे म्हणजे, त्याच्या खोट्या प्रचाराला प्रसिद्धी मिळवून देणे आणि त्याचा जनतेत मोठ्या प्रमाणात प्रचार करणे. त्या मौलानांना ठामपणे सांगितले पाहिजे की, तुमच्या मुद्याला कोणताही लेखी, प्राचीन ग्रंथातील पुरावा नाही. त्यामुळे तुमचा मुद्दा चर्चेच्या लायकीचाही नाही. अगोदर ठोस पुरावा आणून दाखवा. अशा वेळी काही सेक्युलरवादी हिंदूंची मानसिकता होऊ शकते की, कालपर्यंत मुसलमान हिंदु धर्म, देवता यांचा विरोध करत होते आणि आज ते बोलू लागले आहेत की, ‘अल्लाह’ आणि ‘ॐ’ एकच आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या मनाने हिंदु धर्माचा स्वीकार केला आहे. अशा विचारांनी काही तरी कृती करणे, यासारखा दुसरा मूर्खपणा असणार नाही. त्यामुळे त्यांच्याच काही जुन्या वक्तव्यांचा संदर्भ आपण घेतला पाहिजे. जसे की, प्रतिवर्षी २१ जून या दिवशी असणार्‍या ‘योगा दिना’च्या दिवशी आगरा येथील मुफ्ती मुद्दसार अली कादरी याने घोषित केले की, आम्ही ‘योगा’ करू; मात्र त्यात ‘ॐ’चा उच्चार करणार नाही. अरे, मग मौलाना मदनी कसे सांगू शकतात की,  ‘ॐ’ आणि ‘अल्लाह’ एकच आहे.

‘जमात-ए-इस्लामी-हिंद’ने घोषित केले की, सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका; कारण त्यात ‘ॐ’चा उच्चार करावा लागतो.’ ही उदाहरणे पाहिल्यावर लक्षात येईल की, ते इस्लामी सिद्धांतात पालट करत नाहीत, तर त्याविषयीचे नवीन ‘नॅरेटिव्ह’ मांडत आहेत. त्यांचे हे षड्यंत्र उघड करण्यासाठी त्यांच्या मुद्यांचा बौद्धिक प्रतिवाद करा, त्यांच्याकडे लेखी पुरावे मागा !

४ अ. मौलाना मदनी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर : हा विषय जेव्हा मोठ्या प्रमाणात गाजत होता, तेव्हा एका माध्यम प्रतिनिधीने मला याविषयी विचारले, ‘‘तुमचे या संदर्भात काय म्हणणे आहे ?’’ मी त्याला सांगितले, ‘‘ॐ’ आणि ‘अल्लाह’ एकच आहे, हे जर जमियतच्या मौलानांनी मान्य केले असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ते केवळ भाषणात बोलण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. आमचे म्हणणे आहे की, जर ‘ॐ’ आणि ‘अल्लाह’ एकच आहे, तर उद्यापासूनच एक मोहीम चालू करू अन् भारतातील सर्व मशिदींवर ‘ॐ’चे चिन्ह लावण्यापासून प्रारंभ करू, म्हणजे त्यांचे म्हणणे सर्व मुसलमानांपर्यंत पोचेल आणि त्या पुढच्या टप्प्यात ते दिवसातून ५ वेळा जी प्रार्थना करतात, त्यात ते ‘अल्ला हू अकबर’चा नारा देतात, तर त्यात पालट करून त्यापैकी एका वेळी सगळे जण मिळून ‘ॐ’चा जयघोष करूया, नाहीतरी ‘ॐ’ आणि ‘अल्लाह’ यांचा अर्थ एकच आहे. तुम्ही मौलाना मदनीला विचारा की, कोणत्या मशिदीपासून प्रारंभ करूया ? आम्ही ‘ॐ’कारचे उच्चारण करण्यासाठी निश्चित येऊ.’’

५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘नॅरेटिव्ह’चे बौद्धिक युद्ध जिंकणे आवश्यक !

यातून लक्षात येते की, जनरल बिपीन रावत यांनी सांगितलेल्या अर्ध्या आघाडीशी युद्ध करणे किती कठीण आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना सहज होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जर हिंदवी स्वराज्यासाठी इतका संघर्ष करावा लागला, तर सहजपणे कुणी हिंदु राष्ट्राचे दान आपल्याला देणार नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वप्रथम हे ‘नॅरेटिव्ह’चे बौद्धिक युद्ध जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे विचार विरोधकांकडून जेव्हा जेव्हा मांडले जातील, तेव्हा त्यांचा बौद्धिक प्रतिकार करण्याचा प्रयत्न करा.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती