॥ श्रीकृष्णाय नम: ॥
प्रश्न – अध्यात्मात प्रगत असलेल्या मुंबईतील एका जिज्ञासूचे प्रश्न – शरीराचे पाच कोश सांगितले आहेत आणि चार देहसुद्धा सांगितले जातात. हे वेगवेगळे आणि आपसात संबंध नसलेेले आहेत की संबद्ध आहेत? त्यांची सांगड कशी घालायची? ‘महाकारणदेह ज्ञानाचा असतो’ ह्याचा अर्थ काय ?
उत्तर – अध्यात्मशास्त्रात अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे पाच कोश सांगितले आहेत. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारणदेह असे चार देह सांगितले आहेत.
अन्नमय कोश – स्थूल अन्नाचा भोग घेणारा अन्नमय कोश आहे. हा स्थूलदेह आहे.
प्राणमय कोश – शरीराची तहान-भूक, मलमूत्रविसर्जन, हातपायांची हालचाल, श्वासोच्छ्वास इत्यादी कार्ये करण्यार्या इंद्रियांची कार्ये पंचप्राणांमुळे होतात.
कर्मे करणारी इंद्रिये म्हणजे कर्मेंद्रिये आणि पंचप्राण हा प्राणमय कोश आहे.
मनोमय कोश – मन सुख-दु:ख होणारे, ममता बाळगणारे, सतत विचार-संकल्प-विकल्प होत राहणारे असते. ज्ञानेंद्रियांसहित मन हा मनोमय कोश आहे.
विज्ञानमय कोश – वेगवेगळ्या विचारांवर, संकल्प-विकल्पांवर निर्णय घेण्याचे काम बुद्धी करते. ज्ञानेंद्रियांसहित बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे.
प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोशांचा सूक्ष्मदेह असतो.
आनंदमय कोश – सुषुप्तीत, गाढ झोपेत जागेपणातील स्थूल अनुभव आणि स्वप्नावस्थेतील सूक्ष्म अनुभव, अशा चांगल्या-वाईट अनुभवांची जाणीव होत नाही. पण गाढ झोपेतून उठल्यावर मनुष्य ‘आज काय छान झोप लागली होती !’ असे म्हणतो, म्हणजे आनंद झाला होता. तसेच आवडत्या वस्तू मिळाल्यावर होणारा आनंद, त्यांचा उपभोग घेतल्याने होणारा आनंद, अशा लहान-सहान आणि अस्थायी मोदांच्या वृत्ती ह्यात असतात. हा निखळ आणि स्थायी ब्रह्मानंद नाही. हा आनंदमय कोश आहे. स्वस्वरूपाच्या ज्ञानाच्या अभावी किंवा स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मनुष्य भौतिक, व्यवहारातील, संसारातील आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत राहतो. त्यासाठी चांगली-वाईट कर्मे करीत राहतो. मग त्या कर्मांची पुण्य-पापरूपी फळे भोगण्यासाठी पुन्हा-पुन्हा शरीर प्राप्त होत राहते, जन्म होत राहतो. अशा रितीने पुन्हा-पुन्हा सूक्ष्म आणि स्थूल देह प्राप्त होण्याचे कारण असल्याने आनंदमय कोश हा कारणदेह आहे . ‘कारणदेह’ असे पूर्वगतीने, ओघाने म्हटले आहे. अज्ञानरूपाचा ‘कारण’ असा एक वेगळा देह शरीरात नसतो. आपल्या मूळ स्वरूपाचे त्रिगुणांच्या प्रभावाने विस्मरण होणे, स्वस्वरूपाचे अज्ञान हा कारणदेह आहे.
अशाप्रकारे
स्थूल देह – अन्नमय कोश
सूक्ष्म देह – प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोश
कारण देह – आनंदमय कोश
महाकारण देह – ओघाने आलेला महाकारणदेहाचा विषयसुद्धा इथे थोडक्यात जाणून घेऊया. महाकारण देह हा ज्ञानाचा असतोे. इथे ज्ञान म्हणजे व्यावहारिक ज्ञान नसून आत्मज्ञान (तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान) आहे. जेव्हा आत्मज्ञान, स्वरूपाचे ज्ञान होते तेव्हा कारणदेहाच्या पुढची तुरीय (चौथी) अवस्था प्राप्त होते. ह्यात मनुष्य साक्षीभावात असतो. समोर जे घडते ते समबुद्धीने पाहतो, पण जे घडते त्याने सुख-दु:ख होत नाही. ह्यात ‘अहं’ म्हणजे आपल्या वेगळ्या अस्तित्वाचे भान नष्ट झालेले नसते, अद्वैत नसते. म्हणून ‘तुरीय’ अवस्था ही सर्वोच्च अवस्था नाही, पण समत्वयोग झाल्यामुळे, आसक्ती-कामना इत्यादींपासून अलिप्त झाल्याने देहपातानंतर मोक्षप्राप्ती होते. आद्य शंकराचार्यांनी तुरीयचे स्वरूप स्पष्ट करताना माण्डूक्योपनिषदाच्या मंत्र ७ वरील भाष्यात म्हटले आहे – ‘त्र्यवस्थस्यैवात्मनस्तुरीयत्वेन प्रतिपिपादयिषितत्वात्’ अर्थ- ‘तिन्ही (जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती) अवस्थांमध्ये असलेल्या आत्म्याचेच तुरीय रूपाने प्रतिपादन करणे इष्ट आहे.’ म्हणजे अज्ञानामुळे भासणार्या तीन अवस्थांमध्ये तोच आत्मा असतो जो आत्मज्ञान झाल्यावर चौथ्या, अर्थात् तुरीय अवस्थेत जातो. म्हणजे तुरीय अवस्था आधीच्या तीन अवस्थांचे अधिष्ठान आहे. अशा प्रकारे कारणदेहाचेही कारण असल्याने ह्याला ‘महाकारण’ म्हणतात. ह्यालासुद्धा पूर्वगतीनेच, ओघानेच महाकारण देह म्हटले आहे.
– अनंत आठवले २७.०५.२०२३
॥ श्रीकृष्णापर्णमस्तु ॥
पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजीलेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. |