चीन आणि पाकिस्‍तान यांची भारतापेक्षा वेगाने अण्‍वस्‍त्र निर्मिती !

जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे !

संग्रहित छायाचित्र (Twitter )

नवी देहली – शीतयुद्ध संपल्‍यानंतर जगातील अण्‍वस्‍त्रांच्‍या संख्‍येत झपाट्याने घट झाली होती. आता मात्र ही परिस्‍थिती पालटत आहे. अण्‍वस्‍त्र निर्मितीची शर्यत पुन्‍हा चालू झाली आहे. भारताच्‍या तुलनेत चीन आणि पाकिस्‍तान यांनी त्‍यांच्‍या अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वेगाने वाढवली आहे. स्‍वीडनमधील ‘स्‍टॉकहोल्‍म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ने (‘सिप्री’ने) प्रसिद्ध केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या काही वर्षांत चीनने त्‍यांच्‍या शस्‍त्रागारात ६० अण्‍वस्‍त्रांची भर टाकली, तर पाकिस्‍तानने ५ अण्‍वस्‍त्रे विकसित केली. याच काळात भारताने ४ नवीन अण्‍वस्‍त्रांची निर्मिती केली.

‘सिप्री’च्‍या या आकडेवारीनुसार,

१. जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे आहेत. त्‍यांपैकी ९ सहस्‍त्र ५७६ अण्‍वस्‍त्रे ही आक्रमणास सज्‍ज आहेत. यांपैकी ३ सहस्‍त्र ८४४ अण्‍वस्‍त्रे ही क्षेपणास्‍त्रे आणि विमाने यांमध्‍ये बसवण्‍यात आली आहेत.

२. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा ८६ अण्‍वस्‍त्रे वाढली.

३. जगातील ९० टक्‍के अण्‍वस्‍त्रे रशिया आणि अमेरिका यांच्‍याकडे आहेत. या दोन्‍ही देशांची २ सहस्‍त्र अण्‍वस्‍त्रे ‘हाय अलर्ट’वर आहेत.

४. रशिया आणि युक्रेन यांच्‍यात युद्ध चालू झाल्‍यापासूनअण्‍वस्‍त्रांची माहिती देण्‍याच्‍या संदर्भात अण्‍वस्‍त्रसज्‍ज देशांची पारदर्शकता अल्‍प झाली आहे.