मुर्शिदाबाद (बंगाल) येथे काँग्रेसच्या स्थानिक मुसलमान नेत्याची हत्या

  • बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार

  • काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात काँग्रेसचा स्थानिक नेता फुलचंद शेख (वय ४२ वर्षे) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज्यात पंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही ठिकाणी हिंसाचार झाला. त्यातच ही हत्या करण्यात आली. काँग्रेसने या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे, तर तृणमूल काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काजल शेख आणि सफीक शेख या दोघांना अटक केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, हे दोघेही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत.

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, शेख त्यांच्या घराबाहेर बसले असतांना तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता रफीक त्याच्या गुंडांसह तथे आला आणि शेख यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. शेख यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांवरही आक्रमण करण्यात आले.