मंदिरातील वस्त्रसंहिता आणि गदारोळ !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

सध्या मंदिरात वस्त्रसंहिता पालनाविषयीची चर्चा देशभरात होत आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापने यांसह अगदी प्रथितयश ज्वेलर्सच्या दुकानांतही वस्त्रसंहिता लागू असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे. असे असतांना हिंदूंच्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी ठरवल्यास त्यावरून काही राजकीय नेते, पुरो(अधो)गामी, बुद्धीवादी गदारोळ करत आहेत. याविषयी ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

मंदिरात कोणती वस्त्रे परिधान करू नयेत ? याविषयी माहिती देणारा फलक

१. वस्त्रसंहितेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा

पूर्वी न्यायालयांमध्ये न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश हे ज्येष्ठ दिसावेत; म्हणून त्यांना डोक्यावर ‘विग’ (केसांवर लावायचा टोप) लावावा लागत असे, तसेच विग खाली ‘दाढी’ही ठेवावी लागायची. त्यानंतर त्यांना कोट, गाऊन (कपड्याचा झगा) आणि बँड परिधान करणे आवश्यक करण्यात आले. भारतामध्ये वर्ष १९६१ मध्ये ‘ॲडव्होकेट ॲक्ट’ करण्यात आला. त्यात कलम ४९ (१) खाली वस्त्रसंहितेची व्याख्या दिली आहे. त्यानुसार महिलांनी शक्यतो सौम्य रंगाची साडी, पंजाबी ड्रेस, सलवार कुर्ता घालण्याविषयी, तर पुरुषांनी धोतर, विजार, पांढरा सदरा, कोट आणि बँड घालण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवक्त्यांना उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात तर काळ्या रंगाचा गाऊनही घालावा लागतो.

‘न्यायालयात परिधान करायचा काळ्या रंगाचा कोट, काळा गाऊन आणि बँड या गोष्टी विदेशी लोकांसाठी योग्य आहेत; पण भारतातील एकंदर भौगोलिक स्थिती किंवा वातावरण हे या वस्त्रसंहितेसाठी अनुकूल नाही. त्यामुळे येथे हे बंधनकारक ठरवण्यात येऊ नये’, असे वस्त्रसंहितेविषयीचे एक प्रकरण वर्ष २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आले होते. ही मागणी रास्त ठरवून सर्वोच्च न्यायालयाने ‘तालुका, जिल्हा आणि सत्र न्यायालये यांठिकाणी मार्च, एप्रिल, मे अन् जून या ४ मासांमध्ये अधिवक्त्यांना केवळ पांढरा सदरा, पँट आणि बँड घालून न्यायालयामध्ये युक्तीवाद करता येईल’, अशी मुभा दिली. तसेच गणवेशामध्ये पालट करण्यासाठी ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’कडे जाण्यास सांगितले.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. भारतीय परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे

भारतीय परंपरा ही अनादी कालापासून चालू आहे. आपल्याकडे व्यक्तीच्या वस्त्रावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख केली जाते. पूर्वी १९ व्या शतकात महिला नऊवारी साडी आणि पुरुष धोतर नेसत होते. त्यावर पुरुष लांब असा अंगरखा, तर महिला डोक्यावर आणि दोन्ही खांद्यावर पदर घेत होत्या. त्यातून त्यांचे शालीन व्यक्तीमत्त्व उठून दिसत होते. पुरुषही डोक्यावर टोपी घालायचे, तसेच डोक्याला फेट्यासारखे कापड बांधायचे. ही सर्वसामान्य जनतेची वस्त्रसंहिता होती. याखेरीज राजे आणि राजवाड्यातील लोक यांची निराळी वस्त्रसंहिता होती. तेथे राजे, प्रधान आणि सेवक हेही विशिष्ट वस्त्रे परिधान करत असत. त्यामध्ये अलंकारांनाही विशेष महत्त्व होते. काळानुसार यात पालट होत गेला. महिला नऊवारीच्या ऐवजी सहावारी साडी परिधान करू लागल्या. तसेच पुरुष धोतरासमवेतच विजार (पँट) परिधान करू लागले.

३. गुरुकुल पद्धतीचा र्‍हास आणि पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव

भारतीय सात्त्विक वेशभूषा करत असतांना इंग्रज आले. त्यांच्यासमवेत पाश्चात्त्य विकृतीही आली. त्यानंतर भारतियांमध्ये त्यांच्या राहणीमानाचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. इंग्रजांनी नियोजनपूर्वक प्रत्येक भारतीय गोष्ट जुनाट आणि बुरसटलेली आहे, असा विचार आपल्यात रुजवला. परिणामी भारतियांनी पाश्चात्त्य विकृती अंगीकारली. चित्रपटांच्या माध्यमातून ती अधिकच फोफावली. आता तर अतिशय तोकडे कपडे घालण्याची ‘फॅशन’ चालू आहे.

४. ख्रिस्ती आणि मुसलमान यांची वस्त्रसंहिता

ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडेही वस्त्रसंहिता लागू आहे. मुसलमान महिला या हिजाब आणि काळा बुरखा परिधान करतात. पुरुष डोक्यावर गोल टोपी आणि विशिष्ट वस्त्र परिधान करतात. यासमवेतच ते मक्का आणि मदिना येथे पांढरे शुभ्र धोतर नेसून जातात आणि धार्मिक विधी करतात. ख्रिस्त्यांनी केवळ चर्चमध्ये नाही, तर अनेक ठिकाणी वस्त्रसंहिता लागू केली आहे.

एवढेच कशाला चित्रपटसृष्टीतील अतिशय महत्त्वाचा समजल्या जाणार्‍या ‘कान्स फेस्टिवल’मध्येही महिला लाल रंगाचा गाऊन आणि उंच बूट घालतात, तर पुरुष ‘टॅक्सिडो’ प्रकारातील (काळे कपडे) घालतात.

वस्त्रसंहिता हा विषय आस्थापने, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, न्यायालये एवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर युरोपमधील समुद्र किनार्‍यांवरही काही ठिकाणी महिला आणि पुरुष कशा प्रकारे राहू शकतात, याविषयी फलक लावलेले आहेत. संयुक्त राष्ट्रानेही महिलांच्या संदर्भात वस्त्रसंहिता लागू केली आहे. विमान आस्थापने या वस्त्रसंहितेविषयी विशेष आग्रही रहातात.

५. भारतातील विविध सुप्रसिद्ध मंदिरांमधील वस्त्रसंहिता

वस्त्रसंहितेमुळे आपली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक परंपरा यांची ओळख होते. शीख धर्मियांमध्ये पगडी घालणे बंधनकारक आहे. मग केवळ हिंदूंच्या प्रार्थनास्थळांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली, तर पुरोगामी, समाजसुधारक आणि पुढारलेले यांचे पित्त का खवळते ? हे समजत नाही. भारताच्या सुप्रसिद्ध मंदिराप्रमाणे वस्त्रसंहिता पाहिली, तर कन्याकुमारीच्या अमान मंदिराच्या गर्भगृहामध्ये पुरुष सदरा, बनियन आणि धोतर असा वेश परिधान करू शकू शकतात. उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये भस्मारती, अभिषेक आणि पूजा अशा वेळी पुरुष धोतर, तर महिला साडी नेसू शकतात. प्रवेश करतांना महिलांना काही वेळा डोक्यावर पदर घेणे किंवा ‘घुंगट’ बंधनकारक असते. वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये चामड्याच्या वस्तू (कमरेचा पट्टा, महिलांची पर्स अशा वस्तू) आणू देत नाहीत. पुरुषांना त्यांचा सदरा आणि बनियन काढून जावे लागते. काशी विश्वेश्वर मंदिरातही पुरुषांना धोतर, तर महिलांना साडी वगैरे बंधनकारक आहे. तेथे जीन्स आणि टी-शर्ट यांवर बंदी आहे. तिरुपति बालाजी मंदिरामध्ये बर्मुडा, शॉर्ट, टी-शर्ट आदी पोशाखांवर बंदी आहे. तेथे पुरुषांना धोतर, पायजमा आणि महिलांसाठी साडी, पंजाबी ड्रेस परिधान केल्यावरच प्रवेश देण्यात येतो. पद्मनाभ मंदिरात महिलांनी साडी नेसणे आवश्यक आहे. पुरुष ‘मुंडू’ (पांढर्‍या धोतराची लुंगी) परिधान करतात. गोकर्ण महाबळेश्वरला जीन्स, टी-शर्ट, शॉर्ट आणि बर्मुडा यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर किंवा भारतभरातील कोणत्याही गुरुद्वारामध्ये पुरुषांना डोक्यावर रूमाल बांधावा लागतो, तर महिलांना त्यांचा दुपट्टा किंवा साडी यांचा पदर डोक्यावर घ्यावा लागतो.  शिर्डी येथील साईबाबा मंदिरातही वस्त्रसंहिता लागू आहे. तेथे भडक कपडे, टी-शर्ट, जीन्स, बर्मुडा आणि चामड्याच्या वस्तू यांवर बंदी आहे. अय्यप्पा मंदिर येथेही विशिष्ट वस्त्रसंहिता लागू आहे.

६. विविध परीक्षांसाठी बंधनकारक असलेली वस्त्रसंहिता

एवढेच नाही, तर अभियंता, आधुनिक वैद्य, ‘नीट’, ‘जे.ई.ई.’, ‘सी.ई.टी.’ अशा स्पर्धात्मक परीक्षांच्या वेळीही विद्यार्थ्यांनी कोणती कपडे परिधान करावेत, हे निश्चित केले जाते. जर आपण एका दिवसासाठी विशिष्ट पोशाख स्वीकारतो, तर मग मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली, तर त्यात गदारोळ होण्याचे कारण काय?

७. तुळजापूर येथील श्री भवानीमातेच्या मंदिरातील वस्त्रसंहितेच्या फलकावरून झालेला गोंधळ

१८ मे २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी तुळजापूर येथील श्री भवानीमातेच्या मंदिरामध्ये एक नामफलक लावण्यात आला. त्यावर ‘भाविकांनी अशोभनीय आणि असभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नये. भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे भान ठेवून वस्त्र परिधान करावे. येथे वस्त्रसंहिता लागू आहे’, अशी सूचना लिहिण्यात आली होती. अशा प्रकारे या मंदिर प्रशासनाने बर्मुडा, अर्धी विजार, उत्तेजक कपडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे यांवर बंदी घातली. अर्थातच या फलकाचा पुरोगामी मंडळींनी सामाजिक माध्यमांवर निषेध केला. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिराचे प्रशासन हडबडले. त्यांनी ‘तुळजापूरच्या श्री भवानीदेवी मंदिरामध्ये अशी कुठलीही वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली नाही’, असे ताबडतोब सांगितले. एवढेच नाही, तर राजकीय पक्षाचे जन्महिंदु नेते (ज्यांनी वर्ष २०१८-१९ मध्ये सरकारी कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली होती.) त्यांनीही या वस्त्रसंहितेला विरोध करून आधुनिक विचार व्यक्त केले.

८. गोव्याच्या ‘बेसिलिका ऑफ बॉम जिझस’ चर्चमध्ये वस्त्रसंहिता

अनुमाने १२ वर्षांपूर्वी गोव्यातील २ मंदिरांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या मंदिरामध्ये पर्यटकांनी तोकड्या कपड्यात येऊ नये, असा आग्रह धरला होता. त्यानंतर ‘‘बेसिलिका ऑफ बॉम जिझस’ या प्रसिद्ध चर्चमध्ये व्यवस्थित कपडे असलेल्या पर्यटकांनाच चर्चमध्ये प्रवेश देऊ. तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करणार्‍या पर्यटकांना प्रवेश नाकारला जाईल. तसेच अंग झाकण्यासाठी त्यांना शालही उपलब्ध करून देण्यात येईल’, असे फादर सावियो बॅरेट यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार ४५० वर्षे प्राचीन चर्च ‘बेसिलिका ऑफ बॉम जिझस’ येथे वस्त्रसंहिता लागू केली; कारण हे पोर्तुगाल काळात स्थापन झालेले चर्च आहे आणि येथे वस्त्रसंहिता पाळली जाईल.

गोव्यात पर्यटनासाठी विदेशी लोक येतात. त्यांनी उत्तेजक किंवा अंगप्रदर्शन करणारी वस्त्रे घातलेली असतात. त्या वेळी ते मंदिर किंवा प्रार्थनागृह येथेही येतात. त्यामुळे  गोव्यातील ४५० वर्षे प्राचीन महालसा नारायणी मंदिराच्या प्रशासनाने विदेशी लोकांना प्रवेश बंदी केली.

९. महाराष्ट्र मंदिर महासंघ वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी करत असलेले कार्य

नुकतेच जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ स्थापन झाला. त्यातही अनेक मंदिरांच्या प्रतिनिधींनी उस्फूर्तपणे असे सांगितले की, त्यांनीही त्यांच्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यास प्रारंभ केला आहे. केवळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यास मनाई केली जाते. सध्या जळगाव, अमरावती, नागपूर, नगर या जिल्ह्यांतील अनेक मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने वस्त्रसंहिता लागू केली आहे.

१०. वस्त्रसंहितेचा विरोध करणार्‍यांना तमिळनाडू उच्च न्यायालयाची चपराक

‘धर्मग्रंथांमध्ये वस्त्रसंहितेचे विवरण नाही’, असे म्हणणार्‍या लोकांना न्यायालयाने चपराक लावली आहे. तमिळनाडू उच्च न्यायालयाने काही मंदिरांसाठी सात्त्विक वेशभूषा मान्य केली. त्यामुळे तेथे १ जानेवारी २०१६ पासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. त्यात महिलांसाठी साडी, परकर, पोलके, सलवार कुर्ता, पंजाबी ड्रेस, पुरुषांसाठी सदरा, धोतर, पांढरी लुंगी, पायजमा इत्यादींचा समावेश आहे.

११. हिंदूंनो, वस्त्रसंहितेचा लाभ घेऊन देवतांचे चैतन्य मिळवा !

मंदिरे ही भाविकांना सात्त्विकता प्रदान करणारी केंद्रे आहेत. भाविक देवतेचे दर्शन घेतात, तेव्हा त्यांना या सात्त्विकतेचा लाभ होतो. मूर्तीमधून देवतेचे चैतन्य, शक्ती, तेज आणि सकारात्मक स्पंदने बाहेर पडतात. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक सात्त्विकता ग्रहण करायची असेल, तर आपल्या मनात त्या देवतेविषयी भाव पाहिजे, तसेच आपली वेशभूषा आणि आचरणही सात्त्विक पाहिजे. जसे रेडिओ ऐकायचा असेल, तर योग्य ‘फ्रिक्वेन्सी’ (तरंगलहरी) शोधावी लागते. त्याप्रमाणे देवतेशी जुळण्यासाठी ‘फ्रिक्वेन्सी’, म्हणजे सत्त्वगुण हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठीच सात्त्विक वेशभूषा करणे महत्त्वाचे आहे.

सभ्य आणि सात्त्विक कपडे घालणे, हा सुसंस्कृतपणा आहे. या सुसंस्कृतपणाला आधुनिक काळात ‘शिष्टाचार’ म्हणतात. त्यामुळे केवळ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली, तर त्यात ओरड करण्यासारखे काय आहे ? ‘मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता असणे, हा धर्माचरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी या वस्त्रसंहितेचे स्वागत करावे आणि मंदिरांमध्ये अधिकाधिक सात्त्विक कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर देवतांची कृपा होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र साकार होईल.’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२४.५.२०२३)

आस्थापने, कारखाने, रुग्णालये आणि न्यायालये येथील वस्त्रसंहिता

‘११ डिसेंबर २०२० या दिवशी महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी एक वस्त्रसंहिता घोषित केली. त्यानुसार सरकारी कार्यालयांतील कर्मचार्‍यांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यावर प्रतिबंध घातला आहे. सर्व कार्यालयांतील कर्मचार्‍यांकडे राज्यशासनाचे जनमानसातील ‘प्रतिनिधी’ म्हणून पहाण्यात येते, असे शासनाचे याविषयीचे धोरण आहे. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक, खासगी संस्थांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी कार्यालयात येत असतात. सरकारी कर्मचार्‍यांच्या वेशभूषेकडे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते. जेव्हा व्यक्ती कोणत्याही आस्थापनाच्या कार्यालयात प्रवेश करतो, तेव्हा तेथील कर्मचार्‍याच्या राहणीमानाचा प्रभाव त्याला भेटणार्‍यावर पडतो.

याप्रमाणे सरकारी कर्मचार्‍यांनीही किमान शासकीय कार्यालयामध्ये अनुरूप पेहराव करावा. यासमवेतवेच खादीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष कर्मचार्‍याने आठवड्यातून किमान एकदा खादीचे कपडे परिधान करावेत. महिला कर्मचार्‍यांनी शक्यतो सँडल आणि चप्पल, तर पुरुष कर्मचार्‍यांनी बूट आणि सँडल यांचा वापर करावा. महिला कर्मचार्‍यांनी साडी, सलवार, चुडीदार किंवा कुर्ता परिधान करावा आणि त्यावर दुपट्टा असावा, असे सांगण्यात आले होते. विविध आस्थापने, कारखाने, रुग्णालये, न्यायालये येथे कार्य करणार्‍यांची प्रत्येकाची वस्त्रसंहिता ठरलेली आहे. त्या ठिकाणी जातांना कर्मचारी, अधिवक्ता आणि आधुनिक वैद्य यांना नियमानुसार वस्त्र परिधान करावे लागते. रुग्णालयात आधुनिक वैद्य ठरलेला वेश परिधान करतात. त्यातही शस्त्रक्रिया करण्याच्या ठिकाणी निराळी वस्त्रसंहिता असते.

शाळा, महाविद्यालये आणि खेळाचे मैदान येथील वस्त्रसंहिता

प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी विशेष गणवेश असतो. आता तर शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी एकच गणवेश राहील. एवढेच कशाला खेळाच्या मैदानातही वस्त्रसंहिता लागू केलेली असते आणि प्रत्येक जण ती पाळतो.

असे सर्व असतांना हिंदु मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास गदारोळ कशाला ?

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी (२४.५.२०२३)