८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने भारत हा उत्पादन करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय !

चीनपासून दुरावत आहेत आस्थापने !

नवी देहली – प्रचंड उत्पादन आणि निर्यात यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक अर्थव्यवस्थेवर चीनचा दबदबा राहिला आहे; परंतु गेल्या काही वर्षांत हे चित्र वेगाने पालटत आहे. जगभरातील आघाडीच्या ८८ टक्के बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या दृष्टीने उत्पादन करण्यासाठी भारत हा प्रथम पर्याय आहे. जागतिक मनुष्यबळात भारताचा वाटा २२.४ टक्क्यांवरून २४.९ टक्के झाला असून जागतिक महसूल निर्मितीतही ही टक्केवारी १४.८ वरून १५.८ टक्के इतकी झाली आहे. जगभरातील बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

१. ‘आय.एम्.ए. इंडिया २०२३ ग्लोब ऑपरेशन्स बेंचमार्किंग’ नावाच्या सर्वेक्षणात जगभरातील १०० आघाडीच्या आस्थापनांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे मत नोंदवण्यात आले.

२. सर्वेक्षणानुसार बहुराष्ट्रीय आस्थापनांचा चीनवरील विश्‍वास उडत चालला आहे. चीनची भूराजकीय आक्रमकता, संशयास्पद व्यापार आणि व्यावसायिक धोरणे, तसेच वाढत्या खर्चामुळे चीनविषयी साशंकता अन् अविश्‍वास वाढीस लागल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे आस्थापने चीनला पर्याय शोधत आहेत.

३. भारतानंतर व्हिएतनाम आणि थायलंड या दक्षिण-पूर्व एशियातील देशांकडेही आस्थापनांचा गुंतवणुकीसाठी कल आहे.

संपादकीय भूमिका

भारताने यावर समाधान बाळगणे, हे दूरदृष्टीने पाहिल्यास आत्मघात ठरेल. येणार्‍या काळात भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल, हे लक्षात घ्या !