‘एकदा नामजप करत असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२२ च्या जन्मोत्सवाच्या रथोत्सवाचे स्मरण होऊन माझी भावजागृती झाली. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने भावजागृतीचा एक प्रयोग केला. तो त्यांच्याच चरणी अर्पण करते.
१. साधिकेच्या मनात स्वतःच्या देहरूपी रथात वर्ष २०२२ च्या जन्मोत्सवाचा रथोत्सव साजरा करण्याचा विचार आल्यावर इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींनी बैठक घेऊन सोहळ्याचे नियोजन करणे
‘प.पू. गुरुदेव माझ्या हृदयातच आहेत. त्यामुळे या देहातच त्यांचा रथोत्सव साजरा करूया’, असा विचार मनात आल्यावर माझ्या सर्व इंद्रियांना आनंद झाला. ही आनंदाची स्पंदने माझ्या संपूर्ण देहात पसरली. लगेचच इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींनी बैठक घेतली आणि गुरुदेवांच्या रथोत्सवाचे नियोजन केले. यामध्ये ‘सर्वांनी काय करायचे ? सिद्धता कशी करायची ?’, याविषयी ठरवले आणि प्रत्येक इंद्रियाने रथोत्सव साजरा करण्याच्या सेवेचे दायित्व घेतले.
यामध्ये पंचकर्मेंद्रियांनी रथाचे घोडे बनणार असल्याचे सांगितले. लगेचच बुद्धीचे रूपांतर सदसद्विवेकबुद्धीमध्ये झाले आणि तिने भाव अन् भक्ती यांचे लगाम हातामधे घेऊन रथाचे सारथ्य करणार असल्याचे सांगितले. मन लगेच म्हणाले, ‘मी गुरुदेवांचे आसन बनतो.’ भाव, भक्ती आणि श्रद्धा यांनी भारित झालेले मन गुरुदेवांचे आसन बनले. देहातील सप्तचक्रांनी रथाची चाके बनणार असल्याचे सांगितले. पंचज्ञानेंद्रियांनी ती रथाच्या समोर ध्वज घेऊन उभी रहाणार असल्याचे सांगितले. देहातील काही पेशींनी त्या रथाचे उर्वरित भाग बनण्याची सिद्धता दर्शवली, तर काही पेशी म्हणाल्या, ‘आम्ही रथाच्या मार्गावर दोन्ही बाजूंना उभ्या राहून गुरुदेवांचा जयघोष करणार आहोत.’
शरिरातील ७२ सहस्र ८ नाड्यांनी गट केले. त्यांतील एका गटाने रथोत्सवाच्या आधी शंखनाद करायचे ठरवले. दुसर्या गटाने प.पू. गुरुदेवांचा जयघोष करण्याचे ठरवले, तर तिसर्या गटाने ‘नारायण, नारायण’, असा गजर करणार असल्याचे सांगितले. आता राहिले स्वभावदोष आणि अहं ! ‘ते काय सांगणार ?’, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, ‘ज्या मार्गावरून रथ जाणार, त्या मार्गावर आम्ही पायघड्या बनून रहातो. भगवंताच्या स्पर्शानेच आमचा उद्धार होईल.’
अशा रितीने सर्वांनी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने रथोत्सवाचे नियोजन केले. सर्व जण प.पू. गुरुदेवांच्या आगमनाची अत्यंत आतुरतेने आणि व्याकुळतेने वाट पाहू लागले.
२. गुरुदेवांचे विष्णुरूपात आगमन झाल्यावर सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी कृतज्ञता व्यक्त करणे अन् साधिकेची भावजागृती होणे
शंखनाद झाला आणि परात्पर गुरुदेवांचे विष्णुरूपात आगमन झाले. ते माझ्या देहरूपी रथात आसनस्थ झाले. साक्षात् भगवंताच्या आगमनाने आणि त्याच्या स्पर्शाने सर्व इंद्रिये, अवयव, मन, बुद्धी इत्यादींनी कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या संपूर्ण देहामध्ये परात्पर गुरुदेवांच्या नामाचा जयघोष होऊ लागला आणि माझे देहभान हरपून डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. गुरुदेवांच्या कृपेने मी ही भावस्थिती ३० मिनिटे अनुभवत होते.
३. कृतज्ञता
अत्यंत कृपाळू अशी गुरुमाऊली या अज्ञानी जिवासाठी या देहातच अवतरली आणि तिने मला अत्यंत दिव्य अशा रथोत्सवाची अनुभूती दिली.
शब्दांतून व्यक्त कसे करू । न उरे आता काही ।।
संपवले मी-तूपण देवा । कृतार्थ झाले या जीवनी ।।
कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता गुरुमाऊली !
‘भावजागृतीच्या वरील प्रयोगानंतर मी परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सनातनचे सर्व संत यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी सर्व जण घेत असलेल्या अपार कष्टांची मला अंतरातून जाणीव झाली.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (४.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |