(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित चित्र)

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आपण धर्मनिरपेक्ष ही संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभे रहातांना जी शपथ घेतली जाते, त्यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. असे असतांना निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभा करणे आणि त्यातून वेगळे वातावरण निर्माण करणे हे देशाच्या दृष्टीने अयोग्य आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. येथे ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ‘जय बजरंग बली’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. (देवतांच्या नावाच्या घोषणा दिल्या, तर धर्मनिरपेक्षता भंग कशी होते ? मग मुसलमानांचे लांगूलचालन करतांना ती भंग होत नाही का ? – संपादक)

गुरसाळे (तालुका पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त अध्यक्ष शरद पवार हे पंढरपूर येथे आले होते.