पुणे – बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले. श्रींना अभिषेक करून शंकराचार्यांनी आरतीही केली. या वेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेतली.
या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे आदी उपस्थित होते.
शताब्दी महोत्सवात द्वारका आणि ज्योतीर्मठाचे यापूर्वीचे पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हेही मंदिरात दर्शनासाठी येऊन गेले होते. यामुळे आता चारही पीठाचे पीठाधीश्वर मंदिरात दर्शनासाठी येऊन गेले आहेत.
या वेळी शंकराचार्य म्हणाले की, दगडूशेठ गणपति मंदिरात येऊन पुष्कळ आनंद झाला. पुण्यार्जन करायचे असेल, तर या पुण्यनगरीत यायला हवे. भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. पुराणे सांगतात प्रत्येक जण आपल्या कर्माने आणि बुद्धीने पूजनीय होतात. ज्यांच्याकडे बुद्धी असते, त्यांच्याकडेच बल असते. शारीरिक बलापेक्षा बुद्धीबल वाढवण्याची आवश्यकता आहे.