पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नका !- अजित पवार

बारसू (राजापूर) येथील तेलशुद्धीकरणाच्या माती सर्वेक्षणाचे प्रकरण

मुंबई – बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे.

‘रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनात महिला आणि मुले यांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी’, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

सर्व विरोधकांनी बारसूच्या सर्वेक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी ! – उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे माती सर्व्हेक्षण रहित करावे, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. याविषयी  उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, सर्व विरोधकांनीच बारसूच्या सर्वेक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, बारसू येथील वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे.  लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. मला सगळ्याच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्वेक्षण थांबवायचे असेल, तर सगळ्याच पक्षांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि ‘हा उद्योग आम्ही घालवतो आहे’, अशी भूमिका घ्यावी.

  • रिफायनरी प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाच्या वार्तांकनाला नकार

  • पोलिसांच्या भूमिकेचा पत्रकारांनी केला  निषेध

रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या कामाला ग्रामस्थांनी दुसर्‍या दिवशी म्हणजे २५ एप्रिललाही विरोध चालू ठेवला आहे. ग्रामस्थांचा मोठा विरोध असतांना प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात माती सर्वेक्षणाला प्रारंभ केला आहे. या सर्व घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना २५ एप्रिलच्या सकाळी घटनास्थळावरून हाकलण्यात आले. काहींच्या हाताला धरून तेथून बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या या वागणुकीचा येथील पत्रकारांनी निषेध केला.

शहरातील जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात काळ्या फिती लावून हा निषेध नोंदवण्यात आला. ‘आता आम्ही काय वार्तांकन करायचे ?’ हेसुद्धा पोलीसच ठरवणार काय ? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला जात आहे.