|
चिपळूण, १९ एप्रिल (वार्ता.) – लोटे येथील गोशाळेचे उर्वरित २५ लाख रुपयांचे अनुदान सरकारने द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवावा, या प्रमुख मागण्यांसाठी गोशाळेचे संचालक ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांनी उपोषण चालू केले आहे. या उपोषणाला आता ९ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत उपोषणकर्ते ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या कालावधीत ६ गायींचाही मृत्यू झाला आहे. या उपोषणाची कुणीही दखल न घेतल्याने १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता कोकरे महाराज गोमातांसह महामार्गावर ‘रास्ता रोखा’ आंदोलन करणार होते. त्या प्रयत्नात असतांना खेड पोलिसांनी ह.भ.प. कोकरे महाराज यांना कह्यात घेत त्यांना रुग्णालयात भरती केले. या वेळी ‘मी उपचार करून घेणार नाही; मात्र उपोषण चालूच ठेवणार’, असे ह.भ.प. कोकरे महाराज यांनी सांगितले.
सरकारने जागेचा प्रश्न सोडवावा ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
सरकारने आमचा भूखंड परत द्यावा, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवावा. आश्वासन देऊनही मागील ८० दिवसांत सरकारने प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे, असे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाला वारकरी संप्रदायाने पाठिंबा दर्शवला आहे. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. बापू रावकर, देहूचे जालिंदर काळोखे-पाटील, तसेच वारकरी संप्रदायचे पदाधिकारी उपस्थित होते.
ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ पुढे म्हणाले, ‘‘सरकारने ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांचे उपोषण चालूच आहे. आम्ही गायींसाठी आंदोलन करत आहोत. सरकार हिंदुत्वनिष्ठ असेल, तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी. याविषयी ह.भ.प. कोकरे महाराज यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.’’ ह.भ.प. जवंजाळ महाराज यांनी या प्रसंगी हे पत्र उपस्थितांना दाखवले.
ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत ! – उद्योगमंत्री उदय सामंतह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणासंदर्भात मंत्री उदय सामंत म्हणाले की, ह.भ.प. कोकरे महाराज हे जसा गोमातेचा आदर करतात, तसा आम्हीही करतो. त्यांच्या मागणीचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत. मी एम्.आय.डी.सी.चा मंत्री आहे, कुणी जादूगार नाही. त्यांनीही समजून घेतले पाहिजे. कागदपत्रे तयार करावी लागतात. ती तयार करून झाल्यावर त्यांना योग्य तो न्याय मिळेल; मात्र त्यासाठी सतत उपोषण करणे योग्य नाही. |